आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं असून यासंदर्भात सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं आप व अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान स्वाती मालिवाल प्रकरणाबाबत चालू असणारी चर्चा किंवा या प्रकरणाचं माध्यमांमधून होणारं कव्हरेज याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून लावताना दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.
स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणाचं माध्यमांमध्ये सविस्तर कव्हरेज होत असून त्याबाबत उघडपणे चर्चाही होत आहे. मात्र, स्वाति मालिवाल या शारिरीक हिंसाचाराच्या प्रकरणातील पीडिता असून त्यांच्याविषयी चर्चा केल्याने त्यांची ओळख उघड झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. यासंदर्भात चर्चा करताना, वृत्तांकन करताना लोकांनी व प्रसारमाध्यमांनी काळजी घ्यायला हवी, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. तसेच, या वृत्तांकनावर तातडीने निर्बंध आणण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना यामागे राजकीय हेतू असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे.
काय म्हटलं न्यायमूर्तींनी?
दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रितम सिंग अरोरा यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातली सुनावणी झाली. प्राथमिक सुनावणीनंतर खंडपीठानं याचिका फेटाळताना ही पीआयएल म्हणजेच पब्लिसिटी इंटरस्टेट लिटिगेशन असल्याचं नमूद केलं असं टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
“जर इथे पीडिता स्वत:च सर्व वृत्तवाहिन्यांवर जाऊन या सगळ्या घटनेबाबत बोलत आहे, तर त्यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणारे तुम्ही कोण? तुम्ही दाखल केलेल्या या जनहित याचिकेच्या मागे राजकीय हेतूची छटा दिसते आहे. ही याचिका करण्यामागे तुमचा हेतू संदिग्ध आणि इतर छटा असणारा आहे”, असं न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावलं.
VIDEO : “…तर मी तुझी नोकरी खाईन”; मारहाण होण्यापूर्वी स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय घडलं?
“तुम्ही आज जे करताय ते चुकीचं आहे”
“तुम्ही या प्रकरणातील पीडितेच्या वैयक्तिक अधिकारांबाबत बोलत नाही आहात हे स्पष्ट आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. या याचिकेत राजकीय हेतू दिसतोय. तुम्ही हे फक्त प्रसिद्धीसाठी केलं आहे. कोर्टाला बार असोसिएशनला हे विचारायचंय की त्यांचे वकील हे काय करतायत? तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. तुम्ही कायद्याचं ज्ञान घेतलेली व्यक्ती असणं अपेक्षित आहे. घटनेच्या सर्व बाजूंचा विचार तुम्ही करायला हवा. या प्रकरणातील पीडिता यावर बोलत आहे. त्या सर्व वृत्तवाहिन्यांवर जात आहेत. तुमच्या या याचिकेसंदर्भात आम्हाला तुमची बार असोसिएशनकडे तक्रार करावी लागेल”, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलालाही फटकारलं.
दरम्यान, न्यायालयाने बार असोसिएशनकडे तक्रारीचा मुद्दा काढल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिका मागे घेत असल्याची विनंती न्यायालयाला केली.