स्वाइन फ्लूने देशात ९६५ बळी घेतले असून देशात या विषाणूची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांची कमतरता आहे असे सरकारने आज लोकसभेत मान्य केले.
आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, स्वाइन फ्लू तपासणीसाठी भारतात २१ प्रयोगशाळा आहेत, पण ही संख्या अपुरी आहे. एच१ एन१ चाचण्यांसाठी प्रत्येक राज्यात प्रयोगशाळा सुरू केल्या जातील व त्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाईल.
या वर्षी ९६५ लोक स्वाइन फ्लूने मरण पावले असून त्याचवेळी लोकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. स्वाइन फ्लूच्या औषधांची कमतरता नाही ती सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. आरोग्य मंत्रालयाने एच१ एन१ विषाणूच्या संदर्भात थंडी सुरू होताच काळजी घेण्यास सुरुवात करून व्यवस्था केली. नोव्हेंबरमध्ये वेगळे वॉर्ड सुरू करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
आपण तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून आढावा घेतला आहे. थोडा ताप व कफ ही स्वाइन फ्लूची लक्षणे असली तरी ती नेहमी दिसतात, पण रोगाचे निदान झाल्यानंतर औषधे घेण्यात हयगय करू नये, असे ते म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी काल सांगितले की, स्वाइन फ्लूची देशातील १७ हजार लोकांना लागण झाली आहे.