नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील यंत्रणांनी करचुकवेगिरीच्या आरोपाप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत वेगवेगळ्या स्विस बँक खात्यांतील कथित अदानी समूहाशी संबंधित २,६१० कोटी रुपयांची (३१ कोटी डॉलर) खाती गोठविल्याचा दावा ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने स्विस प्रसारमाध्यमांच्या वृत्ताच्या हवाल्याने केला आहे. नव्याने झालेल्या आरोपांना अदानी समूहाने गुरुवारी रात्रीच तात्काळ खुलासा करत फेटाळून लावले. तरी याचा नकारात्मक परिणाम म्हणून भांडवली बाजारात समूहातील १० पैकी सात कंपन्यांच्या समभागांना घसरणीची झळ बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंडेनबर्ग रिसर्चने ‘एक्स’वरील टिप्पणीत म्हटले आहे की, स्विस माध्यमांनी तेथील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीशी निगडित दस्तावेज प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार, अदानी समूहावरील २०२१ मधील करचुकवेगिरीच्या आरोपांच्या तपासात स्विस यंत्रणांकडून ३१ कोटी डॉलरची खाती गोठविली गेली आहेत. तैवानचा नागरिक असलेल्या अदानी समूहाशी निगडित मध्यस्थाने बनावट बीव्हीआय/मॉरिशस अँड बर्म्युडा फंडाच्या माध्यमातून केवळ अदानींच्या समभागांतच कशा प्रकारे गुंतवणूक केली, यावरही तपासात प्रकाश टाकण्यात आला आहे. या फंडाकडून अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात मोठी गुंतवणूक करण्यात आली होती.

हेही वाचा >>> Port Blair : मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान-निकोबारच्या राजधानीचं नाव बदललं, पोर्ट ब्लेअर ‘या’ नावाने ओळखलं जाणार

अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. समूहाने म्हटले आहे की, हे सर्व आरोप निराधार असून, आम्ही त्याचे खंडन करतो. अदानी समूहाचा स्विसमधील कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग नाही. याचबरोबर समूहातील कंपन्यांचे कोणतेही खाते स्विसमधील यंत्रणांनी गोठविले अथवा जप्त केलेले नाही. तेथील न्यायालयाने अदानी समूह अथवा समूहातील कंपनीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. याचबरोबर आमच्याकडे तेथील नियामकांकडून कोणतीही माहितीदेखील मागविण्यात आलेली नाही.

स्वित्झर्लंडमधील ‘गॉथम सिटी’ या प्रसारमाध्यमाने यासंबंधाने वृत्त दिले आहे. त्यानुसार, तेथील फौजदारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून असे दिसून येते की, हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहासंबंधाने आरोपांचा अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वीच या भारतीय उद्याोग समूहाच्या गैरकृत्यांना जिनिव्हाच्या सरकारी वकीलांना उजेडात आणले होते. अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कथित प्रतिनिधीची ३१ कोटी डॉलरपेक्षा जास्त रक्कम असलेली पाच स्विस बँकांतील खाती त्यातून जप्त केली गेली आहेत. स्वित्झर्लंडच्या अॅटर्नी जनरलच्या कार्यालयाने हे प्रकरण माध्यमांकडून उघडकीस आल्यानंतर तपास हाती घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.

हिंडेनबर्गकडून आधीही आरोप

हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अदानी समूहावर गैरप्रकाराचा आरोप केला होता. प्रवर्तक समूहाकडून आडवाटांचा वापर करून भांडवली बाजारात कंपन्यांच्या समभागांचे मूल्य फुगविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. अदानी समूहाशी निगडित परदेशस्थ मध्यस्थांनी समूहातील कंपन्यांत पैसे गुंतविल्याचे हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. स्विस खाती गोठवली गेल्याचे ताजे प्रकरण त्या आरोपांचीच पुष्टी करणारे असल्याचा हिंडेनबर्गचा दावा आहे. अदानी समूहाने त्या वेळीही हिंडेनबर्गने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swiss accounts linked to adani freeze hindenburg new claim adani group denies zws