करचुकवेगिरीला प्रोत्साहन देऊन स्वतकडील खातेधारकांची संख्या वाढवल्याच्या प्रकारामुळे चर्चेत असलेल्या एचएसबीसीच्या स्विस कार्यालयांवर बुधवारी पोलिसांनी छापे घातले. बँकेने अनेकांना धनसफेदीची लालूच दाखवून त्यांच्याकडून खाती उघडून घेतल्याचा आरोप आहे. शोधपत्रकारितेद्वारे नुकतीच बँकेच्या तब्बल एक लाख खातेधारकांची नावे उघड झाली होती. त्यात ११९५ जण भारतीय आहेत.
एचएसबीसी बँकेच्या भारतीय शाखेने अमेरिकेतील आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे अमेरिकेतील भारतीयांना कर चुकवण्यासाठी आपल्याकडे खाती उघडण्याचा सल्ला दिला. याबाबतचे वृत्त अलीकडेच लंडनमधील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. तसेच एचएसबीसीकडील एक लाख खातेधारकांची नावेही नुकतीच उघड झाली होती. त्यातील अनेकांच्या खात्यात प्रचंड प्रमाणात पैसा जमा होता. करचुकवेगिरी करण्यासाठी हा पैसा एचएसबीसीच्या स्विस खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता. बँकेनेही २००८ पासून आपल्या खातेनियंत्रण व्यवस्थेत चुका झाल्याची कबुली नुकतीच दिली होती. या पाश्र्वभूमीवर बँकेच्या सर्व खात्यांची चौकशी करण्यासाठी स्विस पोलिसांनी बुधवारी एचएसबीसीच्या येथील विविध कार्यालयांवर छापे टाकले. यावेळी बँकेतील अनेक महत्त्वाची कागदपत्रे व दस्तावेज जप्त करण्यात आली. एचएसबीसीच्या व्यवस्थापनातील कोणालाही पूर्वसूचना न देता अचानक हे छापे टाकण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एचएसबीसीने २०० देशांतील ग्राहकांना करचुकवेगिरीचा सल्ला देऊन बँकेत पैसे गुंतवण्यास सांगितले होते व त्यात एकूण ११९ अब्ज डॉलरचा कर चुकवण्यात आला होता. अनेक बडे उद्योगपती, वलयांकित व्यक्ती यांची नावे यादीत आहेत. एचएसबीसीने त्यांच्या बाजूने काही चुका कबूल करताना पानभर जाहिरात देऊन माफी मागितली होती.  एचएसबीसीविरोधात अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम आणि अर्जेटिना या देशांमध्ये गुन्हेगारी खटले दाखल असून त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. एचएसबीसीच्या प्रमुखपदी स्टुअर्ट गुलिवर यांची २०११ मध्ये नियुक्ती झाल्यापासून एचएसबीसीच्या कर्मचाऱ्यांची संख्या चौपटीने वाढली आहे, हे विशेष. दरम्यान, एचएसबीसीच्या चौकशीदरम्यान आणखी तपशील उघड होण्याची शक्यता बँकिंगतज्ज्ञांनी व्यक्त केली.

करचुकवेगिरीची लालूच दाखवून बँकेच्या विविध देशांमधील कार्यालयांत खाते उघडणी केली गेल्याचा बँकेवर आरोप आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी बँकेच्या स्विस कार्यालयांवर छापे घालण्यात आले.

Story img Loader