भारताने स्वित्र्झलडवर तेथील बँकांत काळा पैसा असलेल्या खातेदारांची यादी देण्याबाबत दबाव आणल्यानंतर आता स्वीस अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना याबाबत चर्चा करण्यासाठी बेर्नी येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वित्र्झलडने भारताला काही सकारात्मक प्रतिसाद दिले असल्याचे स्वीस अर्थमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सविस्तर माहिती न देण्याच्या अटीवर सांगितले.
स्वित्र्झलडने दिलेला प्रतिसाद तेथे काळा पैसा ठेवणाऱ्या खातेदारांच्या चोरून मिळवलेल्या यादीसंदर्भात नसून वेगळय़ाच बाबतीत आहे. स्वित्र्झलडने इतर देशांकडून भारताला मिळालेल्या नावांच्या संदर्भात काहीच प्रतिसाद दिलेला नाही. फ्रान्स व जर्मनीने भारताला काळा पैसा असलेल्या भारतीय खातेदारांची यादी दिली होती, पण ती माहिती बेकायदेशीररीत्या मिळवलेली आहे.
स्वित्र्झलड सरकारच्या अर्थ प्रवक्त्याने सांगितले, की स्विस सरकारने भारताला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याचे सुचवले असून फेब्रुवारी २०१४ मध्ये कराबाबतच्या पाठपुराव्यावर चर्चा झाली होती. त्यावर आणखी सहकार्य करण्यासाठी बेर्नी येथे चर्चा करण्याचा हा प्रस्ताव आहे. स्विस बँकेत पडून असलेल्या काळय़ा पैशाबाबतची माहिती भारताला का नाकारण्यात आली व आता त्यावर काय उपाययोजना करता येतील यावर विचार चालू आहे. स्वित्र्झलडच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भारत सरकारशी फेब्रुवारीत कराच्या संदर्भात चर्चा केली होती. स्वित्र्झलडने नेमके काय सकारात्मक प्रतिसाद दिले अशी विचारणा केली असता आम्ही भारताला दिलेल्या काही प्रतिसादांबाबत सविस्तर सांगू शकत नाही असे प्रवक्ता म्हणाला.

Story img Loader