जम्मू-काश्मीरमधील काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि तीनवेळा आमदार राहिलेले सय्यद अली शाह गिलानी यांचं निधन झालं आहे. बुधवारी रात्री गिलानी यांचं निधन झालं. हैदरपोरा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रदीर्घ आजारानंतर त्याचं निधन झालं.
Pro-Pakistan separatist leader Syed Ali Geelani dies in Srinagar after prolonged illness: Officials
— Press Trust of India (@PTI_News) September 1, 2021
केंद्रशासित प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी गिलानी यांच्या निधनासंदर्भात ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केलं आहे. “गिलानी साहब यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:खी झाले आहे. आमचं अनेक गोष्टींवर एकमत नव्हतं मात्र एवढ्या दृढ निश्चयाने आणि विश्वासाने आपल्या मतांवर ठाम राहण्यासाठी एक व्यक्ती म्हणून त्यांचा सन्मान करते. अल्लाहताला त्यांना जन्नत प्रदान करो. माझ्या सांत्वना त्यांचे कुटुंबिय आणि शुभचिंतांसोबत आहेत,” असं मुफ्ती ट्विटमध्ये म्हणाल्यात.
Saddened by the news of Geelani sahab’s passing away. We may not have agreed on most things but I respect him for his steadfastness & standing by his beliefs. May Allah Ta’aala grant him jannat & condolences to his family & well wishers.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) September 1, 2021
गिलानी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. ते भारताचा केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानला समर्थन करणारे फुटीरतावादी नेते म्हणून ओळखले जायचे. आधी ते जमात-ए-इस्लामी काश्मीर या फुटीरतावादी संघटनेचे सदस्य होते. नंतर त्यांनी तहरीक-ए-हुर्रियतची स्थापना केली.
गिलानी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी गटांचं नेतृत्व करणाऱ्या ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सचं अध्यक्षपद भूषवलं. गिलानी हे १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील सोपोरचे आमदार राहिले आहेत. मात्र त्यांनी जून २०२० रोजी हुर्रियत सोडलं.
मागील अनेक वर्षांपासून प्रकृतीच्या कारणांमुळे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या मृत्यूच्या अफवा अनेकदा पसरल्याचं पहायला मिळालं. गिलानी कुटुंबियांनी त्यांच्यावर हैदरपोरामध्येच दफनविधी करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केलीय. मात्र गिलानी यांना कुठे दफन केलं जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.