Syria Civil War : सीरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कस वर ताबा मिळवला आहे. याबरोबरच सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांची राजवट उलथवून टाकल्याचे रविवारी सरकारी वाहिनीवरून बंडखोरांनी जाहीर केले आहे. दमास्कस येथील प्रसिद्ध मशिदीतून सीरियामधील बंडखोरांनी हा ऐतिहासिक विजयाची घोषणा केली. अबू मोहम्मद अल-जोलानी याच्या नेतृत्वाखाली इस्लामिक गट हयात तहरीर अल शाम (एचटीएस)ने सीरीयाची राजधानीवर अवघ्या दोन आठवड्यांमध्ये ताबा मिळवला. यानंतर या बंडखोरांच्या गटाचा प्रमुख अबू जोलानी याने सीरीयाचे शुद्धिकरण होत असल्याचे म्हटले आहे.
या मोठ्या विजयानंतर जोलानी याने दिलेल्या संदेशात स्थानिक शक्तींना देखील इशारा देण्यात आला. सीरियाची ड्रग्ज संबंधीची ओळख पुसून टाकण्याच्या संदर्भात बोलताना जोलानी याने, “सीरिया शुद्ध होत आहे” असे म्हटले आहे. तसेच असाद यांच्या नेतृत्वाखाली सीरिया हा कॅपटागॉन या अंमली पदार्थाचा आणि गुन्हेगारीचा जगातील सर्वात मोठा स्त्रोत बनल्याचेही जोलानी यांनी नमूद केले.
विजयानंतर केलेल्या भाषणानात जोलानी यांनी यावेळी समर्थकांना संबोधित करताना हा विजय इस्लामिक राष्ट्राचा विजय असल्याचे म्हटले आहे. तर पुढे बोलताना तो म्हणाला की, “माझ्या बंधूंनो, सर्वशक्तिमान देवाच्या कृपेने हा विजय शहीद, विधवा आणि अनाथ यांच्या बलिदानातून आला आहे. ज्यांनी तुरुंगवास भोगला त्यांच्या दु:खातून हे घडले आहे.”
अबू मोहम्मद अल-जोलानी याचा दमास्कस ताब्यात घेण्यापर्यंतचा प्रवास हा वीस वर्षांपूर्वी अल-कायदाचा एक तरूण सैनिक ते धार्मिक सहिष्णूतेचा पुरस्कार करणारा बंडखोर असा राहिला आहे. दमास्कसमधील विजयानंतर जोलानी याने भाषण देण्यासाठी निवडलेली जागा देखील खूप महत्त्वाची आहे. दमास्कस येथील उमाय्यद मशीद ही जगातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक आहे. जवळपास १,३०० वर्ष जुने हे धार्मिक स्थळ जोलानी याने दिलेल्या संदेशाला वजन मिळवून देते. विजयाची घोषणा एखाद्या टीव्ही स्टूडीओ किंवा पंतप्रधान निवासामधून करण्याऐवजी ती ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या स्थानावरून करण्यात आली. यावेळी जोलानी याने दिलेला संदेश हा असाद यांची सत्ता उलथवून टाकण्यात त्यांना मदत करणारे आणि सध्या मुक्त झालेले सीरियन नागरिक अशा दोन्हीसाठी होता.