पत्रकारांना मुक्तपणे आणि निर्भीडपणे पत्रकारिता करण्याचा अधिकार आहे. मात्र काही देशांमध्ये पत्रकारिता करण्यास अनंत अडचणी येतात. माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा एखादा गौप्यस्फोट उघड करणाऱ्या पत्रकारांच्या जिवाला धोका निर्माण केला जातो. गेली अनेक वष्रे सतत धगधगणारा सीरिया हा देश तर पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक आहे, अशी माहिती अमेरिकेच्या वॉचडॉग या संस्थेने दिली आहे.
वॉचडॉगने नुकतीच पत्रकारांसाठी धोकादायक देश यांची यादी प्रसिद्ध केली आहे. सीरियामध्ये पत्रकारांना अनेकदा लक्ष्य केले जाते. या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असून, युद्धाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांना मृत्यूला सामोरे जावे लागले. सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू या देशात झाल्याने पत्रकारांसाठी हा सर्वात धोकादायक देश असल्याचे वॉचडॉगने सांगितले.
पत्रकारांच्या हत्याप्रकरणाचा उलगडा न होण्यात इराक आघाडीवर आहे. या देशात पत्रकारांची हत्या करणाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नसल्याचे दिसून आले आहे. पत्रकार हत्याप्रकरणातील आरोपींची सहीसलामत सुटका होते. सोमालिया आणि फिलिपाइन्स या देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. २०१२मध्ये इराकमध्ये एकही पत्रकाराची हत्या झाली नव्हती. मात्र २०१३मध्ये १० पत्रकारांना ठार करण्यात आले होते. सोमालियामध्ये तर कायदा व सुव्यवस्था धाब्यावरच बसवली जात असल्याचे चित्र आहे. दहशतवादी गटांचे वर्चस्व असलेल्या या देशात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नेहमीच लक्ष्य केले जाते. स्थानिक प्रशासनही या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेले आहे.
९६ टक्के बळी हे स्थानिक वार्ताहरांचे जात आहेत, असा निष्कर्ष वॉचडॉग मांडतो. राजकारण, भ्रष्टाचार आणि युद्ध यांचे वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांना ठार केले जाते, असे वॉचडॉगकडून सांगण्यात आले.
पत्रकारांसाठी धोकादायक देश
सीरिया, इराक, सोमालिया, फिलिपाइन्स, श्रीलंका, अफगाणिस्तान, मेक्सिको, कोलंबिया, पाकिस्तान, रशिया.

Story img Loader