Bashar Assad Palace Video During Syrian Crisis : सीरियामध्ये बंडखोरांनी अध्यक्ष बशर अल असाद यांचे राजवट उलथवून टाकली आहे. यानंतर असाद हे विमानाने रशियाला पळून गेले आहेत. यामुळे तब्बल १३ वर्षांनी सुरू असलेले सीरियामधील गृहयुद्ध अखेर संपले आहे. बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर इस्लामचा कट्टरपंथी समूह हयात तहरीर अल शाम या गटाचे बंडखोर असाद यांच्या राजवाड्यात घुसले. येथे त्यांनी असाद यांच्या संपत्तीची मनसोक्त लूट केल्याचे पाहायला मिळाले.
असाद यांच्या महालातील लुट सुरू असतानाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असाद यांचे महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील दिसून येत आहे. ज्यामध्ये फरारी, अॅस्टन मार्टिन, रोल्स रॉइस आणि बीएमडब्लू अशा प्रसिद्ध कंपन्यांच्या अनेक लक्झरी कार दिसून येत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बंडखोर हे असाद यांच्या राजवाड्यातील गॅरेजमध्ये फिरताना दिसत आहेत. या भव्य गॅरेजमध्ये असाद यांच्या खाजगी कलेक्शनमधील असंख्य महागडी वाहने दिसत आहेत. मात्र असाद यांचे कार कलेक्शन समोर आल्यानंतर समाज माध्यमांवर यावरून टीका केली जात आहे. लाखो सीरियन नागरिक अत्यंत गरिबीत जीवन जगत असताना, देशाचा नेता मात्र मजेत जगत असल्यावरून लोक राग व्यक्त करत आहेत. सीरीयामध्ये गेल्या १३ वर्षांपासून संघर्ष सुरू होता, यादरम्यान लाखांच्या संख्येने नागरिक विस्थापित झाले आहेत, तर अनेक जण दारिद्र्यात आयुष्य जगत आहेत.
अनेकांचा कित्येक वर्षांपासून छळ
दरम्यान असाद यांच्या राजवाड्यात घुसलेले बंडखोर फर्निचर आणि फोटो लुटताना दिसत आहेत. तर काही जण सेल्फी घेताना तसेच बंदुकींबरोबर उभे राहून फोटो काढताना दिसत आहेत. याबरोबरच सीरियन बंडखोरांनी सायदनाया तुरूंग (Saydnaya Prison) देखील उजेडात आणला आहे. हा तुरुंग कैदांना क्रूर वागणूक देण्यासाठी ओळखले जातो. असाद यांच्या राजवटीत या तुरूंगामध्ये हजारोंच्या संख्येने लहान मुले, महिला आणि पुरूषांना त्रास सहन करावा लागला आहे. लहान मुलांसह अनेक कैद्यांना जमिनीखाली असलेल्या या तुरूंगात कित्येक वर्ष छळ आणि उपासमार सहन करावी लागली.
े
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये बंडखोर या तुरूंगाचे दरवाजे फोडून आतमधील कैद्यांना मुक्त करताना दिसत आहेत. यानंतर त्या कैद्यांची कित्येक वर्षांच्या दुराव्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी भेट झाली. कित्येकांनी तर काही दशकांनी त्यांच्या कुटुंबियांना पाहिले.
इस्लामिक बंडखोर गट हयात तहरीर अल शाम यांच्या नेतृत्वात अलेप्पो येथून या उठावाची सुरूवात झाली होती. या बंडखोरांनी अत्यंत वेगाने सीरियामधील महत्वाची शहरे ताब्यात घेतली. या गटाला असाद यांच्या लष्कराकडून अगदी जुजबी विरोधाला सामोरे जावे लागले. बंडखोरांनी सीरियाची राजधानी दमास्कस ताब्यात घेतल्यानंतर बशर अल-असाद यांची २४ वर्षांची राजवट संपुष्टात आली. या बंडाळी दरम्यान असाद हे मॉस्को, रशिया येथे पळून गेले आहेत.