Israel – Palestine News in Marathi : इस्रायलने गुरुवारी राजधानी दमास्कस आणि उत्तरेकडील अलेप्पो या मुख्य विमानतळांवर हल्ले केले. इस्रायलच्या हल्ल्यामुळे विमानतळांचं नुकसान झालं असलं तरीही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिणामी इथल्या सेवा खंडित करण्यात आल्या आहेत.
सीरियातील डॅमास्कस आणि अलेप्पो शहर ही दोन्ही विमानतळे सीरिया सरकारकडून चालवली जातात. परंतु, इस्रायलने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही दोन्ही विमानतळे बंद करण्यात आली आहेत. सीरियाला इराणकडून होणाऱ्या पुरवठा लाइनमध्ये व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने इस्रायलने हल्ले चढवले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री, होसेन अमीराब्दुल्लाहियान हे सीरिया दौऱ्यावर येणार होते, त्याच्या एक दिवस आधी हे हल्ले झाले.
विमानतळांवरील लँडिंग स्ट्रिपचे नुकसान झाल्याने या दोन्ही विमानतळांवरील सेवा खंडित करण्यात आली आहे, अशी माहिती येथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
हेही वाचा >> Israel – Palestine War : “आम्ही ब्लँकेटमधून पाहत होतो, वडिलांना डोळ्यांदेखत…”, अल्पवयीन मुलीनं सांगितला हत्येचा थरार
इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्रांचा मारा सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत २,३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर जखमींची संख्या ७,००० च्या पुढे आहे. हमासच्या गाझा पट्टीतल्या तळांवर क्षेपणास्र डागली. युद्धासह इस्रायलने अनेक आघाड्यांवर पॅलेस्टाईनला कोंडित पकडलं आहे. इस्रायलने गाझा पट्टीत पाणी, वीज आणि इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. यामुळे गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत.
हेही वाचा >> “…तोवर तुमचं पाणी, इंधन आणि वीज बंद”, इस्रायलच्या ऊर्जामंत्र्यांचा पॅलेस्टाईनला इशारा
ऊर्जामंत्री काट्ज यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, इस्रायली ओलीस मायदेशी परतत नाहीत तोवर गाझा पट्टीसाठी वीजेचं बटन ऑन केलं जाणार नाही. पाण्याचा नळ सुरू केला जाणार नाही. त्याचबरोबर त्यांना कुठल्याही प्रकारचं इंधन मिळणार नाही. गाझाला कुठल्याही प्रकारची मानवी मदत मिळणार नाही.