T Raja Singh Tears Bangladesh Flag : सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकणारे भाजप नेते आणि तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी नुकतेच गोव्यातील बदलत जाणाऱ्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी असाही दावा केला की, गोव्यात मुस्लिम लोकसंख्या ज्या दराने वाढत आहे, त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दक्षिण गोव्यातील करचोरम येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात टी राजा सिंह म्हणाले की, गोव्यात हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे आणि असा दावा केला की “जिथे हिंदू लोकसंख्या कमी झाली आहे, तिथे हिंदूंचे धर्मांतर झाले आहे.” या कार्यक्रमात टी राजा सिंह यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर बोलताना बांगलादेशचा ध्वजही फाडला.
बांगलादेशचा ध्वज फाडला
गोव्यातील या कार्यक्रमात आमदार टी राजा सिंह यांनी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरही भाष्य केले. ते म्हणाले, “बांगलादेशातील हिंदूंना मारले जात आहे. त्यांची दुकाने लुटली जात आहेत. ते मदत मागत आहे. ‘बजरंगी’ बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी लढण्यास तयार आहेत. मोदीजी फक्त १५ मिनिटे सीमा खुल्या करा आम्ही करुन दाखवू.” टी राजा सिंह यांनी यावेळी भारताविरोधात जो उभारेल त्याला त्याला असेच भोगावे लागेल म्हणत बांगलादेशचा ध्वज फाडला.
हे ही वाचा : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
“जर हिंदूंनी ‘हम दो हमारे दो’ काय म्हणाले राजा सिंह?
पुढे बोलताना राजा सिंह यांनी दावा केला की, “जर हिंदूंनी ‘हम दो हमारे दो’ कायदा पाळला तर पुढील २० ते २५ वर्षांत पाकिस्तानातील हिंदूप्रमाणेच भारतातील हिंदूंनाही अत्याचार सहन करावे लागलील.” या कार्यक्रमात टी राजा सिंह यांनी असाही दावा केला की, “जर भारतातील मुस्लिम लोकसंख्या वाढत राहिली आणि जर त्यांचे ३०० खासदार आले तर पंतप्रधान कोणाचा होईल? त्यांचाच ना. ज्या देशांत ‘त्यांचा’ पंतप्रधान निवडला जातो, तिथल्या हिंदूंची काय अवस्था झाली हे इतिहासाने पाहिले आहे.
हे ही वाचा : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
दक्षिण गोव्यातील करचोरम येथ झालेल्या कार्यक्रमात टी राजा सिंह यांनी ४८ मिनिटे भाषण केले. यावेळी राजा सिंह यांनी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना “लव्ह जिहाद” विरुद्ध लढण्यासाठी आमच्यात सहभागी व्हा, असे आवाहन केले.