तुमचा टी शर्ट वाजतोय. बघा नीट कदाचित मोबाइल वाजत असेल. टी शर्टात ठेवलेला मोबाइल वाजत नाहीए. टी शर्टच मोबाइल फोन आहे.
वैज्ञानिकांनी पुढच्या पिढीचे नवे तंत्रज्ञान शोधले असून त्याच्या मदतीने छोटे, कार्यक्षम, लवचीक मोबाइल फोन तुमच्या कपडय़ावरच छापले जातील व ते काम करतील. ऑस्ट्रेलियातील मोनश विद्यापीठातील वैज्ञानिकांनी स्पॅसर तंत्रज्ञान वापरून ही मोबाइल छपाई केली आहे.
त्यांनी जगातील पहिला स्पॅसर (सरफेस प्लासमॉन अॅम्प्लीफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रॅडिएशन) हा कार्बनचा बनवलेला मोबाइल तयार केला आहे. स्ॅपसर हा अब्जांश पातळीवरील लेसर म्हणजे नॅनो लेसर असतो व तो मुक्त इलेक्ट्रॉन स्पंदित झाल्यानंतर प्रकाश सोडतो. नेहमीच्या लेसरमध्ये विद्युतचुंबकीय लहरी असतात व त्यामुळे जास्त जागा व्यापणारी उपकरणे असतात.
मुख्य संशोधक चनाका रूपासिंगे यांनी सांगितले, की स्पॅसर डिझाइनमध्ये कार्बनचा वापर केल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. इतर स्पॅसरचे डिझाइन हे सोने किंवा चांदीच्या नॅनो कणांमध्ये केले जात असे. अर्धवाहकातही त्यांचा वापर केला जात असे आम्ही आता ग्राफिन रेझोनेटरचा वापर केला असून कार्बन नॅनोटय़ूबमुळे बरेच फायदे झाले आहेत असे रूपासिंगे यांनी सांगितले.
कार्बनचा स्पॅसर डिझाइनमध्ये वापर म्हणजे अधिक लवचीकता व जास्त तपमान सहन करण्याची क्षमता तसेच पर्यावरणस्नेही वस्तू हे त्यांचे वैशिष्टय़ असते. या गुणधर्मामुळे, अतिशय पातळ असा मोबाइल कपडयांवर छापता येईल. स्पेसर आधारित उपकरणे सध्याच्या ट्रान्झिस्टर आधारित उपकरणांना पर्याय आहेत, सध्याच्या उपकरणात सूक्ष्मसंस्कारक (मायक्रोप्रोसेसर) स्मृती, तरंगलांबी मर्यादा असतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. स्पॅसरचा वापर करून मोबाइल बनवण्यासाठी ग्राफिन व कार्बन नॅनोटय़ूब्जचा वापर करता येईल. कार्बनचे नॅनो धागे पोलादापेक्षा मजबूत असतात व तांब्यापेक्षा चांगले असतात.
उच्च तपमानाला ते टिकून राहतात. ग्राफिन व कार्बन नॅनोटय़ूब्ज एकत्र वापरून विजेचे वहन प्रकाशाच्या माध्यमातून करता येते. प्रकाशीय क्रिया वेगवान व ऊर्जासक्षम असतात व संगणक चिप्ससाठी सुलभ असतात. चनाका यांच्या मते ग्राफिन व कार्बन नॅनोटय़ूब्ज यांचा वापर केल्याने उपकरण मजबूत, हलके, वाहक व औष्णिकदृष्टय़ा स्थिर बनते, त्यांचे यांत्रित, विद्युतीय व प्रकाशीय गुणधर्म वेगळे असतात. त्यांची चाचणी सूक्ष्म अँटेना, विद्युतवाहक व तरंग मार्गदर्शक तयार करता येतात.
चनाका यांच्यामते स्पॅसर तंत्राने तीव्र विद्युत क्षेत्र अगदी अब्जांश जागेत बनवता येते व तेही धातूचे नॅनोकण प्रदीप्त करण्याच्या क्षमतेचे असते, म्हणजेच ते लेसरपेक्षा प्रखर असते, एसीएस नॅनो या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा