उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक जावीद अहमद हे सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहेत. जावीद अहमद यांनी उत्तर प्रदेश पोलीस दलासाठी मागवण्यात आलेल्या टेसर गनची स्वत:वरच चाचणी करून पाहिली. सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या या प्रयोगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्या साहसाचे अनेकांकडून कौतूकही केले जात आहे. या व्हिडिओत जावीद यांच्यावर टेसर गनचा मारा केला जाताना दिसत आहे. यावेळी दोन सहकाऱ्यांनी त्यांना दोन्ही बाजूंनी पकडले आहे. जावीद यांच्यावर टेसर गनचा मारा केल्यानंतर ते लगेचच जमिनीवर कोसळताना दिसतात. मात्र, सहकाऱ्यांनी त्यांना सावरल्यामुळे ते जमिनीवर अलगदपणे पडले. टेसर गन हे इलेक्ट्रॉशॉक प्रकारातील शस्त्र असून टेसर गनच्या माध्यमातून एखाद्या लक्ष्यावर इलेक्ट्रोड डार्टचा मारा केला जातो. या इलेक्ट्रोड डार्टसमुळे शरीरातील चेतातंतू आणि स्नायू काहीवेळासाठी दुर्बल होतात. दंगलीच्या काळात जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून या गन्स मागविण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयात रविवारी या गन्सचा डेमो देण्यात आला. यावेळी डेमो देणाऱ्या व्यक्तीने एका एटीएस कमांडोकडे इशारा करून ज्याला कुणाला या बंदुकीचा प्रभाव जाणून घ्यायचा आहे त्याने स्वत:वर प्रयोग करून पाहावा, असे म्हटले. जावीद अहमद यांनी हे आव्हान स्विकारत त्यांच्यावर ट्रेसर गन आजमावून पाहायला सांगितली. सुरूवातीला इतर अधिकाऱ्यांनी जावीद यांना असे करण्यास मनाई केली. मात्र, जावीद खान आपल्या निश्चयावर ठाम राहिले आणि त्यांनी ट्रेसर गनची बुलेट स्वत:वर झाडून घेतली.
या प्रयोगानंतर जावीद खान यांनी ट्रेसर गन अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले. ट्रेसर गनची बुलेट लागल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर अक्षरश: काजवे चमकले. मला माझ्या पायांवर धड उभेही राहता येत नव्हते. एखाद्यावर ट्रेसर गन झाडल्यास ती व्यक्ती पळून जाऊच शकत नाही. त्यामुळे दहशतवादी कारवायांदरम्यान ट्रेसर गन खूप फायदेशीर ठरू शकते, असे जावीद खान यांनी म्हटले.

Story img Loader