Tahawwur Rana Demands Quran In NIA Custody: मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याचे अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआय) त्याचा ताबा घेतला आहे. दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेतील कटाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय एनआयएने तहव्वूर हुसेन राणा याची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. या चौकशी दरम्यान राणाने कुराण, पेन आणि कागदांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

तहव्वुर राणा याला नवी दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील एनआयएच्या मुख्य कार्यालयात अत्यंत सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले आहे, जिथे सुरक्षा कर्मचारी चोवीस तास पहारा देत आहेत, असे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

इतर कैद्यांप्रमाणे वागणूक

दरम्यान तहव्वुर राणा यला “इतर अटक केलेल्या व्यक्तींप्रमाणेच वागणूक दिली जात असून,त्याला कोणतीही विशेष वागणूक दिली जात नाही”. त्याच्या विनंतीनुसार त्याला कुराणची प्रत देण्यात आली आहे. एनआयएच्या मुख्यालयातील त्याच्या कोठडीत तो दररोज पाच वेळा नमाज अदा करताना दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यबाबात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.

कुराण, पेन आणि…

एनआयएच्या एका अधिकाऱ्याने राणाचे “धार्मिक माणूस” असे वर्णन करत तो त्याच्या कोठडीत पाच वेळा नमाज अदा करताना दिसत आहे”, असे सांगितले. याचबरोबर राणाने अधिकाऱ्यांकडे कुराणची प्रत मागितली होती. ती त्याला देण्यात अल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

“कुराण व्यतिरिक्त, तहव्वूर राणाने पेन आणि कागद मागितला होता. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. राणाने पेनचा वापर स्वतःला इजा करण्यासाठी करू नये याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या व्यतिरिक्त, त्याने इतर कोणत्याही मागण्या केलेल्या नाहीत”, असे अधिकाऱ्याने नमूद केले.

दर दुसऱ्या दिवशी दिल्ली वकीलाला भेटण्याची परवानगी

न्यायालयाच्या निर्देशांनुसार, तहव्वूर हुसेन राणा याला दर दुसऱ्या दिवशी दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाने दिलेल्या वकिलाला भेटण्याची परवानगी आहे. दर ४८ तासांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. “अटक केलेल्या इतर व्यक्तींप्रमाणेच सर्व प्रक्रियांचे पालन केले जात आहे,” असे दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर दिल्ली न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला १८ दिवसांची कोठडी दिल्यानंतर राणाला शुक्रवारी सकाळी एनआयए मुख्यालयात आणण्यात आले. आता एनआयए मुंबई दहशतवादी हल्ल्यातील राणाच्या भूमिकेचा तपास करणार आहेत.