Tahawwur Rana Lawyer: २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणा याचे नुकतेच अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केले आहे. दरम्यान भारतात आणल्यानंतर राणाला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी राणाने न्यायालयाला विनंती केली आहे की, त्याच्या माध्यमातून नाव आणि प्रसिद्धी मिळवणारा कोणत्याही वकीलाने त्याची बाजू मांडू नये.
लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या राणाचे गुरुवारी २६/११ च्या हल्ल्यानंतर १६ वर्षांनी अमेरिकेकडून भारताकेडे प्रत्यार्पण करण्यात आले. रात्री १० वाजता त्याच्या औपचारिक अटकेनंतर, त्याला पटियाला हाऊस येथील एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २० दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी मंजूर केली.
आदेशात, अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एनआयए) चंदर जित सिंग म्हणाले, “त्याची बाजू मांडण्यास अशा कोणत्याही वकिलाला परवानगी देऊ नये जो त्याच्याद्वारे नाव आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करेल.”
न्यायालयाचे निर्देश
कायदेशीर सेवा सल्लागार कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ मध्ये समाविष्ट असलेल्या वैधानिक योजनेनुसार त्याची बाजू मांडण्यासाठी वकील उपस्थित होते. तरी, न्यायालयाने आरोपीची विनंती स्वीकारली आहे. यावेळी न्यायालयाने, कायदेशीर सेवा सल्लागाराने या प्रकरणातील आरोपींबद्दल मीडिया (प्रिंट/डिजिटल/इलेक्ट्रॉनिक) शी बोलू नये, असे निर्देश दिले आहेत.”
चोवीस तास पहारा
दरम्यान, तहव्वूर राणाला दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तेथे सीआयएसएफ कर्मचारी आणि एनआयएचे दोन अधिकारी चोवीस तास पहारा देत आहेत. राणाला एनआयए मुख्यालयातील कॅन्टीनमधील अन्न आणि जेवणासह मूलभूत गरजा पुरवल्या जात आहेत,” असे एका सूत्राने सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
भारताचे आरोप
६४ वर्षीय राणाने, एकेकाळी पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये सेवा बाजावली आहे. त्याला मुंबई हल्ल्याच्या ११ महिन्यांनंतर ऑक्टोबर २००९ मध्ये शिकागो येथे अटक करण्यात आली होती. २६/११ हल्ल्यातील त्याच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती देताना, अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारताने आरोप केला आहे की राणाने त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमन हेडलीला भारतात रेकी करण्यासाठी मतद केली आहे.”