Tahawwur Rana And David Headley : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला १० एप्रिल रोजी भारतात आणलं आहे. अमेरिकेकडून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांच एक पथका अमेरिकेला जाऊन त्याला भारतात घेऊन आलं आहे. त्यानंतर राणाला न्यालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली असून आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याची चौकशी सुरू केली आहे.
तहव्वूर राणावर भारतात १० गंभीर खटले दाखल करण्यात आले असून यात हत्या, हत्येचा कट, दहशतवादी कारवायांमधील सहभाग, फसवणुकीसह इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. भारताने तहव्वूर राणाविरोधात केलेल्या आरोपांमुसार त्याने त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमॅन हेडली याला हल्ल्याची योजना बनवण्यासाठी, हल्ल्याची ठिकाणं निश्चित करण्यासाठी, त्या ठिकाणांची रेकी करण्यासाठी मदत केली होती. त्यासाठी त्याने मुंबईत इमिग्रेशन व्यवसायाची नकली शाखा उघडली होती. हेडलीला त्या शाखेचा संचालक म्हणून नेमलं होतं. दोन वेळा बनावट दस्तावेजांसह व्हिसासाठी अर्ज दाखल केले होते.
“भारतीयांना अशीच अद्दल घडायला हवी होती”, २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर तहव्वूर राणाचं हेडलीसमोर कुत्सित वक्तव्य
दरम्यान, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाची चौकशी करत असताना अनेक गुपितं उघड झाली आहेत. ज्यामुळे तहव्वूरची भूमिका व त्याचे हेतू स्पष्ट झाले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तो डेव्हिड हेडलीला म्हणाला होता की “भारतीयांना अशीच अद्दल घडायला हवी होती. भारतीय त्याच लायकीचे आहेत”. तहव्वूर राणा एवढ्यावरच थांबला नाही. २६/११ च्या हल्ल्यात भारतीय नागरिक, पोलीस व सैनिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान निशान-ए-हैदर देऊन त्यांचा गौरव करण्याची मागणी देखील त्याने केली होती.
राणा-हेडलीने डेन्मार्कमध्येही दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.
तहव्वूर राणा केवळ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी नव्हता तर त्याने अनेक दहशतवादी कारवाया केल्याचे पुरावे आहेत. २०१३ मध्ये अमेरिकन न्यायालयाने त्याला लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेची मदत करणे व डेन्मार्कमधील दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. तसेच, डेव्हिड हेडली याला ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.