Tahawwur Rana wants to talk to family : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याची सध्या भारतीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. यादरम्यान राणा याने आपल्या कुटुंबीयांशी बोलण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. तहव्वुर राणाने १९ एप्रिल रोजी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर आपल्या वकिलांमार्फत याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायाधीशांना सोमवारी एनआयएला २३ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
६४ वर्षीय राणा हा मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनेडियन उद्योजक आहे. राणा याला कोर्टाने १० एप्रिल रोजी १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान एनआयएने आरोप केला आहे की, गुन्हेगारी कटाचा एक भाग म्हणून, आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीने भारत येण्यापूर्वी राणाबरोबर संपूर्ण मोहिमेबद्दल चर्चा केली होती.
सामना करावा लागू शकतो अशा आव्हानांचा अंदाज घेतल्यानंतर हेडलीने राणा याला त्याच्याकडे असलेल्या मालमत्ता आणि वस्तूंबद्दल माहिती देणारा इमेल पाठवला होता, अशी माहिती एनआयएने रिमांडची मागणी करताना कोर्टात सांगितले. हेडलीने राणाला या कटात पाकिस्तानी नागरिक इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमान यांचाही सहभाग असल्याची माहिती दिली असा आरोपही एनआयएने केला आहे.
राणा हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि अमेरिकन नागरिक डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी याचा जवळचा सहकारी आहे. राणा याला ४ एप्रिल रोजी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अरबी समुद्रातून मुंबईत दाखल होत अनेक ठिकाणी हल्ला केला होता. जवळजवळ ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले.