तैवानमध्ये आज सकाळी महाभीषण भूकंप झाला आहे. ७.२ रिश्टर स्केलवरील हा भूकंप असून गेल्या २५ वर्षांतील हा सर्वांत मोठा भूकंप मानला जातोय. दरम्यान, या भूकंपामध्ये जवळपास २५ ते २६ इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. त्यामुळे, दक्षिण जपान आणि फिलिपाईन्सच्या बेटावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तैवान टेलिव्हिजन स्टेशन्सने भूकंपाच्या केंद्राजवळील विरळ लोकसंख्या असलेल्या पूर्वेकडील हुआलियनमधील कोसळणाऱ्या इमारतींचे फुटेज दाखवले. स्थानिक मीडियानुसार, या भूकंपामुळे इमारतीखाली काही लोक अडकले आहेत. परंतु मृत्यू किंवा जखमींचे अद्याप कोणतेही वृत्त नाही.

तैवानच्या मध्यवर्ती हवामान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी तैपेईच्या अनेक भागांमध्ये भयंकर भूकंप झाला. तैवानच्या पूर्व किनारपट्टीपासून अगदी १५.५ किमी खोलीवर सकाळी ७ वाजून ५८ हा भूकंप झाला आहे. या भूकंपाचा परिणाम म्हणून जपानच्या समूद्रकिनाऱ्यावर त्सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. जपानच्या हवामान एजन्सीने सांगितले की अनेक लहान त्सुनामी लाटा ओकिनावाच्या दक्षिणेकडील प्रांताच्या काही भागात पोहोचल्या आहेत. त्यामुळे येथे त्सुनामीचाही धोका वर्तवण्यात आला आहे.

आजूबाजूच्या देशातही जाणवले भूकंपाचे धक्के

फिलीपिन्सच्या भूकंपविज्ञान यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, समूद्र किनारी भागातील रहिवाशांसाठी एक सतर्कतेचा इशारा दिला असून त्यांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर, शांघायमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. चीनच्या फुझियान प्रांतातील फुझोऊ, झियामेन, क्वानझोउ आणि निंगडे येथेही हे धक्के जाणवल्याचं असे चीनच्या राज्य माध्यमांनी सांगितले.

२५ वर्षांतील सर्वात मोठा भूकंप

तैवानच्या अधिकृत केंद्रीय वृत्तसंस्थेने सांगितले की, १९९९ पासून बेटावर बसलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. त्यावेळी ७.६ रिश्टर स्केलच्या धक्क्याने सुमारे २४०० लोकांचा मृत्यू जाला होता. तर, या भूकंपात ५० हजाराहून अधिक इमारती भूईसपाट झाल्या होत्या. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशनने सांगितले की भूकंपाने हुआलिअन काउंटीमध्ये अपर ६ ची दुसरी सर्वोच्च तीव्रता नोंदवली. अप्पर ६ च्या भूकंपात बहुतेक काँक्रीट-ब्लॉकच्या भिंती कोसळतात आणि लोकांना उभे राहणे शक्य होत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taiwan hit by strongest quake in 25 years buildings damaged sgk