लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर आता एनडीएने सत्ता स्थापनेचा दावा केला असून लवकरच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जगभरातील प्रमुख नेत्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यासंदर्भात तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनीही नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. त्यांच्या अभिनंदनाच्या ट्विटवर नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे आभार व्यक्त केले होते. मात्र, यामुळे चीनचा जळफळाट झाला. त्यावर चीनने नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या उत्तरावर चीनने प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते, माओ निंग म्हणाले, “जग चीनच्या तत्त्वावर विश्वास ठेवते. या आधारावर चीन जगभरातील देशांशी संबंध निर्माण करतो. वन चायना धोरणाला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदींनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अभिनंदनाला विरोध करायला हवा, असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटलं.

हेही वाचा : संसदेच्या आवारातील पुतळे ‘मार्गदर्शक मंडळा’त? गांधी, आंबेडकर, फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे स्थलांतरित

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी काय म्हटलं होतं?

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं होतं. त्यावर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, “भारत-तैवान यांच्यातील परस्पर भागीदारी, व्यापार, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यास तयार आहेत. जेणेकरून इंडो पॅसिफिकमध्ये शांतता प्रस्थापित होईल”, असं तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग यांनी म्हटलं होतं. त्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की,”भारत तैवानशी जवळचे संबंध निर्माण करण्यास तयार आहे.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर चीनने संताप व्यक्त करत भारताला तैवानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील वृत्त फाईनान्स एक्सप्रेसने दिलं आहे.

मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव

मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या खूर्चीवर विराजमान होणार असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूसह अनेक दिग्गज नेते आहेत. यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही शुभेच्छा दिल्या. नेतान्याहू यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री नव्या उंचीवर जावो.बधाई हो!”,अशा शुभेच्छा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taiwan president lai ching te omn prime minister narendra modi and china objected marathi news gkt
Show comments