भारतीय उपखंडामध्ये आपलं महत्त्व आणि वर्चस्व वाढवण्यासाठी चीन नेहमीच आक्रमक भूमिका मांडताना दिसून आला आहे. नेपाळ, भूतान, तैवान या छोट्या देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा देखील सातत्याने चीनकडून प्रयत्न होताना दिसत आहे. मग ते वर्चस्व प्रत्यक्ष असो, वा निर्णय प्रक्रियेत दबाव निर्माण करण्याच्या स्वरुपात असो. आता मात्र तैवाननं गंभीर इशारा दिला आहे. चीनकडे लष्करी हल्ला चढवण्याची पूर्ण तयारी झाली असून २०२५ मध्ये चीनकडून तशी पावलं उचलण्याची दाट शक्यता असल्याची भिती तैवानचे संरक्षण मंत्री चियू कुओ चेंग यांनी व्यक्त केली आहे. तैवानच्या संसदेत बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
गेल्या ४० वर्षांतला सर्वाधिक तणाव!
तैवानच्या संसदेमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असताना तैवानचे संरक्षण मंत्री चियू कुओ चेंग यांनी यासंदर्भात भिती व्यक्त करतानाच गंभीर इशारा दिला आहे. “चीनसोबत असलेला लष्करी तणाव गेल्या ४० वर्षांत सध्या सर्वाधिक वाढला आहे. तैवान स्ट्रेट भागामध्ये चीनकडून मिसफायर होण्याची शक्यता देखील वाढली आहे. संपूर्ण तैवानवर ताबा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्र आत्ताच चीनकडे आहेत. पण इतर आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता चीन २०२५मध्ये तैवानवर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी हल्ला करण्याची शक्यता आहे”, असं चेंग म्हणाले आहेत.
“माझ्यासमोर आत्ता आणीबाणी उभी आहे”
दरम्यान, चेंग यांनी दोन्ही देशांमधील सध्याच्या परिस्थितीवर देखील भाष्य केलं. “एक लष्करी अधिकारी म्हणून माझ्यासमोर आत्ताच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२५ पर्यंत चीन हल्ल्याची तयारी पूर्ण करेल. त्यांच्याकडे आत्ताच ती क्षमता आहे, मात्र, इतर सर्व घटक लक्षात घेण्यासाठी ते वाट पाहतील”, असं चेंग म्हणाले.
तैवाननं लष्करी खर्चात केली मोठी वाढ
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, लष्करी खर्चात वाढ केल्याची माहिती चेंग यांनी तैवानच्या संसदेत दिली आहे. देशांतर्गत शस्त्रास्त्र बनवण्यासाठी प्रामुख्याने हा निधी खर्च केला जाणार आहे. यामध्ये वेगवेगळी क्षेपणास्त्र आणि युद्ध नौकांचा समावेश आहे. पुढील ५ वर्षांमध्ये प्रामुख्याने नौदलाशी संबंधित शस्त्रास्त्रे तयार करण्याचं धोरण तैवाननं आखलं आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि तैवानमधील संबंध बिघडले आहेत. विशेषत: गेल्या काही दिवसांमध्ये तैवानच्या हवाई हद्दीत अनेक चिनी लष्करी विमानं घिरट्या घालत असल्याचा दावा तैवानकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चीनच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी तैवाननं देखील शस्त्रसज्ज होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
तैवान हा आमचाच भाग, चीनची भूमिका
चीनने याआधी देखील तैवान हा त्यांचाच भाग असल्याचा दावा केलेला असून आवश्यकता पडल्यास बळाच्या जोरावर तैवान ताब्यात घेण्याचे देखील सूतोवाच चीनने दिले आहेत. तैवानने मात्र त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. तैवान हा एक स्वतंत्र देश असून आपलं स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचवण्यासाठी तैवान लढा देईल, असं तैवाननं जाहीर केलं आहे. दुसरीकडे अमेरिकेनं तैवानला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला असताना चीनने अमेरिकेचा निषेध केला आहे.