ट्रान्सएशिया एअरवेज या कंपनीचे छोटेखानी प्रवासी विमान उड्डाणानंतर नदीवरील पुलाला धडकल्याने झालेल्या अपघातात २६ जण ठार झाल्याची घटना बुधवारी तैवानची राजधानी तैपेई येथे घडली. विमानाच्या एका इंजिनाला आग लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विमानात एकूण ५८ प्रवासी होते, त्यापैकी १५ जणांना वाचवण्यात यश आले, तर २१ प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये चिनी पर्यटकांचा समावेश आहे.


ट्रान्सएशिया एअरवेज ही तैवानची देशांतर्गत विमान वाहतूक कंपनी आहे. या कंपनीच्या एटीआर ७२-६०० या जातीच्या छोटेखानी विमानाने बुधवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता येथील साँग्झहॅन या विमानतळावरून उड्डाण केले. ५३ प्रवासी व पाच विमान कर्मचारी असे एकूण ५८ जणांचा समावेश असलेले हे विमान किनमेन या बेटाकडे निघाले होते, मात्र उड्डाणानंतर लगेचच विमानाच्या दोनपैकी एका इंजिनाला आग लागली. त्यामुळे एका बाजूला विमान झुकले व विमानतळानजीक असलेल्या नदीपुलाच्या कठडय़ाला धडकून नदीत कोसळले. तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. १५ जणांना वाचवण्यात यश आले, तर २६ जण ठार झाले. विमानाचा पुढील भाग पाण्यात बुडाला असून त्यात आणखी काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. विमानाचा एक पंखा पुलाच्या कठडय़ाला धडकून विमान नदीत पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ट्रान्सएशियाच्या विमानाला अपघात होण्याची ही गेल्या सहा महिन्यांतील दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये तैपेई विमानतळावर एक विमान वादळात सापडून कोसळले होते. त्यात ४८ प्रवासी ठार झाले होते.