संयुक्त राष्ट्रांच्या वतीने गुरुवारी ‘जागतिक पर्यावरण दिनी’ आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रांमध्ये पर्यावरणविरोधी घटकांविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे, असा सूर साऱ्याच तज्ज्ञांनी लावला. वातावरणातील बदल रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सागरपातळी वाढत असून, त्यामुळे लहान बेटांना धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणविरोधी घटकांमुळेच पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इ. संकटे निर्माण होत आहेत, अशी चर्चा या चर्चासत्रांमध्ये करण्यात आली.
ग्लोबल वॉर्मिग आणि वातावरणातील बदल या फार मोठय़ा जागतिक समस्या झाल्या आहेत. हरितगृह वायू उत्सर्जनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून, त्यामुळे लहान लहान बेटांमध्ये वसलेल्या देशांना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान विभागाचे प्रमुख ख्रिस्तिना फिगर्स यांनी सांगितले. लहान बेट असलेल्या ५२ देशांना हरितगृह वायू उत्सर्जनाच्या वाढीमुळे धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिली.
‘‘विकसनशील राष्ट्रे असलेल्या लहान बेटांच्या दुर्दशेला वातावरणातील बदल कारणीभूत आहेत. याचा सर्वानी विचार करावा आणि ही बेटे वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. समुद्राचा स्तर वाढतोय, मात्र तुमचा आवाज काही येत नाही. ही बेटे वाचविण्यासाठी तुम्ही आवाज उठवा,’’ असे आवाहन मून यांनी केले.
लहान बेटे असलेल्या ग्रेनेडा, मालदीव आणि मार्शल या देशांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते. हरितगृह वायूंचे उत्सर्जन आणि पर्यावरणातील हानिकारक बदल रोखण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या देशांना वातावरणातील बदलांचा फार मोठा धोका आहे. समुद्राचे आक्रमण व क्षारयुक्त जमिनींमध्ये वाढ असा धोका आमच्या देशांना निर्माण झाला आहे. मात्र त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे या देशांच्या प्रतिनिधींनी सांगितले.