लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेला त्यांच्या वायदे बाजारातील सौद्यांमधील नुकसान कमी लेखणाऱ्या काही विसंगती आढळल्याचे जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळाला चालू तिमाहीत त्यासंबंधित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या १० मार्च रोजी इंडसइंड बँकेने तिच्या वायदे बाजारातील सौद्यांच्या हिशेबात विसंगती आढळल्याचा शेअर बाजारांना सूचित करणारा उलगडा केला. बँकेच्या विदेशी चलनांतील व्यवहाराशी संबंधित हिशेबी चूक झाल्याच्या या खुलाशातून बँकेचा तोटा साधारण बँकेच्या निव्वळ मालमत्तेच्या सुमारे २.३५ टक्के म्हणजेच २,१०० कोटी रुपयांच्या घरात जाणारा असल्याचे अंतर्गत छाननीतून आढळल्याचे बँकेने म्हटले आहे. या सौद्यांसाठी झालेला खर्च बँकेकडून कमी लेखला गेल्याचे आणि ही बाब सप्टेंबर २०२४ मध्ये लक्षात आल्याचे बँकेकडून सांगितले गेले. खुलाशानंतर लगेचच, बँकेच्या समभागात मोठ्या घसरण झाली होती.
इंडसइंड बँकेने त्यांच्या सध्याच्या प्रणालींचा व्यापक आढावा घेण्यासाठी, प्रत्यक्ष परिणामाचे जलद मूल्यांकन करण्यासाठी आणि लेखाजोखा करण्यासाठी बाह्य लेखापरीक्षण पथकाची नियुक्ती केली आहे, असे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बँकेच्या सर्व ग्राहक आणि भागधारकांना आवश्यक खुलासे केल्यानंतर, विद्यामान तिमाहीत त्यासंबंधित उपाययोजना पूर्णपणे पूर्ण करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाला दिले आहेत. इंडसइंड बँकेचे आर्थिक स्थिती समाधानकारक असून त्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. विद्यामान महिन्यात ९ मार्च २०२५ रोजी बँकेचा लिक्विडिटी कव्हरेज गुणोत्तर (एलसीआर) ११३ टक्के असे समाधानकारक पातळीवर असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
देशातील सनदी लेखापालांची सर्वोच्च संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)’ने, कथित २,१०० कोटी रुपयांच्या हिशेबी तफावतींचा स्वत:हून उलगडा करणाऱ्या इंडसइंड बँकेच्या आर्थिक विवरणपत्रांची छाननी करणारा आढावा तिच्याकडून घेतला जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.