सध्या सत्तेवर असलेले भ्रष्ट राजकारणी लोकपाल विधेयक कधीही संसदेत मंजूर होऊ देणार नाहीत आणि म्हणूनच लोकांनी पुढील निवडणुकीत भ्रष्ट  राजकारण्यांना सत्तेवरून हटवून स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे तडाखेबंद आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी येथील विविध जाहीर सभांमधून केले.
तमाम लोकांची सेवा करण्यासाठी नेत्यांनी निवडून दिले जाते. परंतु हे नेते एकदा संसदेत आणि विधिमंडळात पोहोचले की दरोडेखोरांच्या भूमिकेत शिरून लोकांच्या पैशांवर डल्ला मारतात, या शब्दांत अण्णांनी सत्तारूढ नेत्यांवर तोफा डागल्या. ज्या राजकारण्यांची प्रतिमा स्वच्छ आहे, तुमच्यावर सत्ता गाजविण्यापेक्षा जे लोक तुमची सेवा करतील त्यांनाच तुम्ही निवडून द्या, असे आवाहन हजारे यांनी केले. विद्यमान संसदेतील १६३ सदस्य आणि १५ मंत्री कलंकित असल्याचाही आरोप अण्णांनी केला. ब्रिटिश राज्यकर्ते देश सोडून गेले परंतु भ्रष्ट आणि गुंड लोकांच्या हाती त्यांनी आपला देश दिला, असाही टोमणा अण्णांनी मारला.
भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्यासाठी जनलोकपाल विधेयक आवश्यक आहे आणि हे होऊ न देण्यासाठीच हे भ्रष्ट राजकारणी जनलोकपाल विधेयक कधीही मंजूर होऊ देणार नाहीत. तुमची फसवणूक होऊ देऊ नका, अशा इशारा अण्णांनी जनतेस दिला.
देशात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली असून जात, धर्म आणि धार्मिक मुद्दय़ांवरून राजकारणी तुमच्यात फूट पाडत आहेत, अशी टीका माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी या वेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा