पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित करण्याची जबाबदारी भाजपच्या संसदीय मंडळाची आहे. आधी भाजपला निर्णय घेऊ द्या, नंतर त्यावर रालोआमध्ये शिवसेना व अकाली दलासोबत सल्लामसलत होईल, अशा शब्दात शनिवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या नावावर ‘नरमाई’ची भूमिका घेतली.
दिल्लीत तीन दिवस मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी असोचॅमच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना देशाला विश्वासार्ह चेहऱ्याची गरज असून तो आपल्याला दिसत नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचा अर्थ शिवसेनेला मोदींचे नेतृत्व विश्वासार्ह वाटत नाही, असा काढला गेला. पण त्यावर घूमजाव करीत आपण केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसविषयी हे विधान केल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आणि वेगळा अर्थ लावल्याबद्दल प्रसिद्धीमाध्यमांवर ठपका ठेवला. नरेंद्र मोदींच्या उमेदवारीविषयी शिवसेना उत्साहित नसल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांच्या नावाला पाठिंबा दिला होता, याकडे लक्ष वेधले असता त्यावेळी भाजपच्या अन्य कुठल्याही नेत्याचे नाव पुढे आले नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिर आणि हिंदूत्वाचे मुद्दे निश्चितच असेल. पण सर्वसामान्य लोकांच्या मनात वेगळे प्रश्न आहेत. त्यांच्या आयुष्यात उद्भवलेल्या संकटांच्या प्रश्नांची उत्तरे ते आम्हाला मागत आहेत. त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याची नव्या सरकारची जबाबदारी आहे. याचा अर्थ आपण राम मंदिराचा विरोध वा समर्थन करतो, असा होत नाही. मी िहदू असलो तरी दुसऱ्या धर्माचा अनादर करा, असाही त्याचा अर्थ होत नाही. राम मंदिराएवढाच देशाच्या विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे, असे ठाकरे म्हणाले.
.. तर निवडणूक लढणार : आदित्य
आवश्यकता भासली आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर आपण निवडणूक लढू, असे या पत्रकार परिषदेला हजर असलेले आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आज आपले वय २२ वर्षे आहे. निवडणूक लढायची की नाही, हे ठरवायला आणखी तीन वर्षे आहेत, असे ते म्हणाले.

पावसाचा गोंधळ

राज्यसभेतील शिवसेनेचे गटनेते संजय राऊत यांच्या ११, फिरोजशाह रोडच्या हिरवळीवर उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पावसाची शक्यता गृहित धरून मंडपही घालण्यात आला होता. उद्धव ठाकरे ठरल्यावेळी पोहोचलेही. पण साडेबारानंतर पावसाने उग्र रुप धारण केले आणि मंडपासह सारी तयारी मोडीत निघाली.

अखेरीस कॉन्स्टिटय़ूशन क्लबच्या नव्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पण तिथेही पावसाने ठाकरे आणि पत्रकारांचा पिच्छा पुरविला.  सर्वत्र पावसाचे पाणी साचलेल्या अवस्थेत शेवटी ही पत्रकार परिषद पूर्ण झाली.