मुलींच्या अधिकारासाठी पुढाकार घेण्याचे ‘आयआयएम- बंगळुरु’मधील प्राध्यापकांचे आवा
हिजाबच्या मुद्दय़ावरून धाकदपटशांचा सामना करणाऱ्या मुस्लीम मुलींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयआयएम- बंगळूरुमधील पाच प्राध्यापकांनी शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाला केले. त्याचप्रमाणे अझीम प्रेमजी विद्यापीठातील १८४ विद्यार्थ्यांनी हिजाब घालणाऱ्या विद्याथ्र्यिनींना पाठिंबा देणारे निवेदन जारी केले आहे.
पेहरावाच्या मुद्दय़ावर शिक्षण नाकारले जात असलेल्या तसेच विशिष्ट पेहेरावामुळे जमावाकडून उपद्रव दिला जात असलेल्यांसोबत आपण असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हिजाबवरून देशभरातच निर्माण झालेल्या वादात आणखी भर पडली आहे. या निवेदनात संबंधित विद्यार्थ्यांनी आपली बाजू शांततेत मांडावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. सध्याच्या अभूतपूर्व आणि झाकोळल्या गेलेल्या या कालखंडात आम्ही एकजुटीने उठविलेल्या या आवाजाची दखल घेतली जाईल, असा आशावाद अझीम प्रेमजी विद्यापीठातील या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
हिजाबच्या वादात राष्ट्रीय महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आयआयएम- बंगळूरुच्या प्राध्यापकांनी केली आहे. आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना हे आवाहन करणाऱ्यांत हेमा स्वामीनाथन, रित्वीक बॅनर्जी, दीपक मलघन, दलहिया मणी आणि प्रतीक राज यांचा समावेश आहे. आपण कोणत्याही धर्मातील पुरातन र्निबधांचे समर्थन करीत नाही, पण त्यावरू कोणा एका धर्मातील पद्धतीला लक्ष्य करणे आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिजाब वादावरून निदर्शने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उडुपी येथे शुक्रवारी पोलिसांनी पथसंचलन केले.