पाकिस्तान सरकारने सरबजित सिंगच्या फाशीबाबत सबुरीने निर्णय घ्यावा, असे मत जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ)चे प्रमुख यासिन मलिकने व्यक्त केले आहे. संसदेवरील हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी अफजल गुरूला शनिवारी फाशी देण्यात आली आहे. भारत सरकारच्या या कृतीचे उत्तर म्हणून सरबजितला फाशी देण्याची मागणी पाकिस्तानात करण्यात येत आहे.
सरबजितबाबतच्या फाशीबाबत काही जणांच्या भावना तीव्र आहेत, पण त्याबाबत घाई करण्याची गरज नाही, असे मलिकने सांगितले. यापूर्वी मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाबच्या फाशीनंतरही सरबजितला फाशी देण्याची मागणी पाकिस्तानमधील काही संघटनांनी केली होती. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी झाल्याप्रकरणी सरबजितला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या दयेचा अर्ज अद्याप प्रलंबित आहे. सरबजित याप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.