Italian Prime Minister Giorgia Meloni : अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्सला संबोधित करताना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्या विचारसरणीवर टीका केली. जगभरातील कंझर्व्हेटिव्ह नेते लोकशाहीसाठी धोका आहे, असं चित्रित केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

व्हिडिओ-लिंकद्वारे परिषदेला संबोधित करताना मेलोनी म्हणाले, “९० च्या दशकात जेव्हा बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी जागतिक डाव्या विचारसरणीचे उदारमतवादी नेटवर्क निर्माण केले तेव्हा त्यांना राजकारणी म्हटले गेले. आज जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हटले जाते.”

तरीही नागरिक आम्हाला मतदान करतात

“हे डाव्यांचे दुटप्पीपणाचे मानक आहे, पण आम्हाला त्याची सवय झाली आहे. चांगली बातमी अशी आहे की लोक आता त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, ते आमच्यावर कितीही चिखलफेक करत असले तरी. नागरिक आम्हाला मतदान करत राहतात”, असंही त्या पुढे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की “रूढीवादी वाढतच आहेत, युरोपीय राजकारणात अधिकाधिक प्रभावशाली होत आहेत आणि म्हणूनच डावे घाबरले आहेत आणि ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांची चिडचिड उन्मादात बदलली आहे, केवळ रूढीवादी जिंकत असल्यानेच नाही तर रूढीवादी आता जागतिक स्तरावर सहयोग करत आहेत”.

…यामुळे अमेरिकेच्या राजकारणाला चालना मिळेल

वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर मेरीलँडमधील नॅशनल हार्बर येथे कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्सला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही एक नवीन आणि चिरस्थायी राजकीय बहुमत निर्माण करणार आहोत जे येणाऱ्या पिढ्यांसाठी अमेरिकेतील राजकारणाला चालना देईल.”

युक्रेनमधील रशियाच्या युद्धावरून युरोपमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी रूढीवादी पोलिश अध्यक्ष आंद्रेज दुडा यांची भेट घेतली. व्यासपीठावर आल्यानंतर ट्रम्प यांनी दुडा आणि अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई यांना नमस्कार केला. ट्रम्पने दुडाला “एक उत्तम माणूस आणि माझा एक चांगला मित्र” असे म्हटले.