अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे काही दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला चढवला. त्यामुळे विमानतळाची सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांत जोरदार चकमक उडाली. यात चार हल्लेखोर ठार झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
विमानतळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता. या इमारतीतूनच त्यांनी विमानतळाच्या दिशेने रॉकेट डागले. दहशतवाद्यांना काबूलवरून उड्डाण करणाऱ्या विमानांना लक्ष्य करायचे होते, असे अफगाणिस्तानचे लष्कर जनरल अफझल अमान यांनी सांगितले.
तुंबळ चकमकीनंतर चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आमच्या पथकांना यश आले आहे, असे काबूलचे पोलीस प्रमुख मोहम्मद झहीर झहीर यांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यात एकही नागरिक अथवा पोलीस अधिकारी जखमी झाला नसल्याचे ते म्हणाले. या कारवाईनंतर विमानतळावरील सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे अमान यांनी सांगितले.
सावधगिरीचा उपाय म्हणून विमानतळावरील काही ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत असून धावपट्टी अथवा इतर ठिकाणी स्फोटके ठेवण्यात आली आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban attack on kabul airport