अफगाणिस्तानमध्ये जेव्हापासून तालिबानी शासन सुरु झालं, तेव्हापासून तेथील जनतेवर, विशेषत: महिलांवर विविध निर्बंध लादले जात आहेत. अशातच आता तालिबान सरकारने आणखी एक नवीन फतवा जारी केली आहे. ज्यामुळे अफगाणिस्तानमधील महिलांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

तालिबान सरकारच्या नव्या फतव्यानुसार महिलांना इतर महिलांच्या उपस्थितीत मोठ्याने कुराण पठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश तालिबान सरकारमधील मंत्री मोहम्मद खालिद हनाफी यांनी जारी केले आहेत. महिलांनी इतर महिला आजुबाजुला असताना मोठ्याने कुराण पठण करणे टाळावे, असं त्यांनी या आदेशात म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना, महिलेचा आवाज ‘अवरा’ मानला जातो. त्यामुळे तो सार्वजनिकपणे ऐकला जाऊ नये, इतर महिलांनीही तो ऐकू नये, असं तालिबानचे मंत्री म्हणाले.

हेही वाचा – विश्लेषण : तालिबानला का मिळतेय आंतरराष्ट्रीय स्वीकृती? ‘मागील दाराने’ किती देशांनी व्यवहार सुरू केले जुलमी राजवटीशी? 

महत्त्वाचे म्हणजे तालिबान सरकारच्या फतव्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा निर्णयांमुळे महिलांची मुक्तपणे बोलण्याची क्षमता बाधित होऊ शकते. तसेच त्या सार्वजनिक जीवनापासून दूर जाऊ शकतात, अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?

दरम्यान, तालिबानने यापूर्वीही अशाप्रकार अनेक फतवे काढले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्याबरोबरच संपूर्ण शरीर झाकावे, असा आदेश तालिबानने काढला होता. तसेच त्यापूर्वी तालिबानने महिलांच्या पुरुषांबरोबर बोलण्यावरही बंदी घातली होती.