अफगाणिस्तानातून झालेल्या सात भारतीयांच्या अपहरणामागे तालिबानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालिबानी नेता शाहीन या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. पोलीस प्रवक्ते झबीउल्लाह शूजा यांनी इंडिया टुडेशी बोलताना या अपहरणामागे तालिबान असल्याचे सांगितले. अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतातून रविवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी सात भारतीय आणि एका अफगाण ड्रायव्हरचे अपहरण केले. अपहरण झालेले सर्वजण केईसी या भारतीय ऊर्ज कंपनीचे कर्मचारी असून या कंपनीचा बाघलान प्रांतामध्ये प्रकल्प सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपहरणकर्त्यांशी आमचा अद्याप थेट संपर्क प्रस्थापित झालेला नसून स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून आम्ही संर्पक साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तालिबानच्या ताब्यात असलेले भारतीय कर्मचारी सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत असे झबीउल्लाह यांनी सांगितले.

ज्या भागातून भारतीयांचे अपहरण करण्यात आले तिथे तालिबान्यांचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. तो संपूर्ण भाग शाहीनच्या नियंत्रणाखाली आहे असे झबीउल्लाह यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आम्हालाही आमच्या कर्मचाऱ्यांची चिंता आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन यावर जास्त काही बोलणार नाही. कर्मचारी सुरक्षित परत यावेत यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत असे केईसी इंटरनॅशनले एमडी आणि सीईओ विमल केजरीवाल यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास बाघलान प्रांतातून काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचे अपहरण केले. बाघलान प्रांताची राजधानी पुल-ए-खोमरेमधील बाग-ए-शामल गावातून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले . स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कर्मचारी प्रवासात असताना ही घटना घडली. या परिसरात भारतीय कंपनीला वीज उपकेंद्राचे काम मिळालेले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban behind the abduction of indians in afganistan