तालिबानी अतिरेक्यांनी अफगाणिस्तानच्या संसदेवर सोमवारी केलेल्या हल्ल्यात बॉम्बस्फोट व गोळीबार करण्यात आला. यावेळी गोंधळ उडाल्याने खासदारांना सुरक्षित आश्रय शोधावा लागला, तसेच हा हल्ला दूरचित्रवाणीवर थेट प्रक्षेपणामुळे दिसू शकला. या हल्ल्यात सात हल्लेखोरांसह दोनजण ठार झाले असून त्यात एका मुलाचा समावेश आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रीपदाच्या उमेदवाराचा परिचय करून दिला जात असताना हा हल्ला झाला. हा हल्ला दोन तास सुरू होता. त्यानंतर आत्मघाती कार बॉम्बरसह सात हल्लेखोरांना सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ठार करण्यात आले.
पहिला कार बॉम्ब संसद इमारतीच्या मुख्य रस्त्यावर उडवण्यात आला. सात हल्लेखोर होते व या हल्ल्यात १५ नागरिक जखमी झाले आहेत. अग्निशस्त्रांच्या मदतीने हातबॉम्ब टाकण्यात आले. खासदार महंमद रेझा खोशक हे त्या वेळी त्यांच्या कक्षात होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचे अधिवेशन सुरू होते. संरक्षण मंत्र्यांचा परिचय करून दिला जात असताना एकदम मोठा स्फोट झाला. काही सेकंदातच संसदेचे आवार धुराने भरून गेल्याचे अंतर्गत सुरक्षा उपप्रवक्ते नजीब दानिश यांनी सांगितले.
तालिबानने एप्रिलमध्ये देशात हल्ले केले होते व त्यात सरकार व परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. अफगाणी धर्मगुरूंनी अलीकडेच रमझाननिमित्त हल्ले थांबवण्याचे केलेले आवाहन तालिबान्यांनी धुडकावले आहे.
यापूर्वी २०१२ मध्ये आत्मघाती हल्लेखोरांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. २००१ मध्ये अमेरिकी आक्रमणानंतर अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता संपुष्टात आली होती. काबूलमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा ठिकाणांवर तालिबानने हल्ला केल्याने नाटो सेनेच्या मदतीशिवाय अफगाणिस्तानचे सैन्य तालिबानला तोंड देऊ शकत नाही हे परत सिद्ध झाले आहे. नाटोने त्यांची मोहीम डिसेंबरमध्ये बंद केली होती.
दरम्यान, हल्ल्याबाबत तालिबानचा प्रवक्ता झबिनउ्ला मुजाहिद याने ट्विटरवर म्हटले आहे की, अनेक मुजाहिद्दीन संसदेच्या इमारतीत घुसले होते. तालिबान्यांनी कडक सुरक्षा भेदल्याचा पोलिसांनी इन्कार केला व संरक्षण मंत्र्यांचा परिचय चालू असताना हा हल्ला झाल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा