तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांचं महिलांविरोधी धोरण समोर आलंय. काबूलमधील शर-ए-नॉ येथील ब्यूटी सलूनबाहेरचे महिलांचे स्प्रे-पेंट केलेले फोटो हटवण्यात आले आहेत. या संदर्भातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका मीडिया आउटलेटने ट्विट केलेल्या फोटोमध्ये तालिबानचा एक कार्यकर्ता रायफलसह सलूनच्या भिंतींवर असलेले फोटो रंगवून मिटवताना दिसतोय. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा मिळवला. त्यानंतर तालिबान्यांनी भिंतींवर रंगवलेली महिलांची अनेक छायाचित्रे रंगवून हटवल्याचे फोटो समोर आले आहेत.

लग्नाच्या कपड्यांच्या जाहीरातींमधील स्त्रियांना पांढऱ्या रंगाने रंगवून मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकीच एक फोटो बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीदेखील ट्विट केला होता. त्यामध्ये “तालिबान अफगाणी महिलांना नष्ट करत आहेत. यापुढे तिथं कुठेही महिला दिसणार नाहीत. महिला केवळ लैंगिक गुलाम आणि मूल जन्माला घालणारी मशीन म्हणून घरीच राहतील. कट्टरतावादी तालिबानच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होईल,” असं मत नासरीन यांनी व्यक्त केलं होतं. दरम्यान, जगभरातून अफगाणी महिलांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील महिलांचे हक्क हिरावले जातील, असं म्हटलं जातंय.

Story img Loader