अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. २० वर्षापूर्वी तालिबानी सत्तेचा अनुभव असलेल्यांच्या मनात अजूनही भीती घर करून आहे. त्यामुळे अनेक जण अफगाणिस्तानातून पळ काढताना दिसत आहे. दुसऱीकडे तालिबानने नव्या विचारांसह सत्तेत आलो असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र त्यांच्यावर विश्वास नसल्याने अनेकांच्या मनात धास्ती कायम आहे. असं असलं तरी तालिबानचं एक एस्कॉर्ट ऑपरेशन सध्या चर्चेत आहे. जवळपास १५० भारतीयांना सुखरुपरित्या विमानतळावर पोहोचवल्याची चर्चा जोरात रंगू लागली आहे.

काबुलमध्ये असलेल्या एका राजदूतासंह १५० भारतीयांना तालिबानने सशस्त्र विमानतळावर सुखरुप सोडलं. न्यूज एजेंसी एएफपीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. काबुलच्या भारतीय दुतावासाबाहेर एके-४७ आणि रॉकेट लॉन्चर्ससह तालिबानची तुकडी उपस्थित होती. दुसरीकडे दुतावासात १५० लोकं उपस्थित होते. तालिबानची दहशत पाहता त्यांना बाहेर निघणं कठीण झालं होतं. तालिबान त्यांना जीवे मारेल, अशी भीती सतावत होती. मात्र तालिबानने त्यांना कोणतीही इजा पोहोचवण्याऐवजी सुरक्षितरित्या विमानतळावर सोडलं. तालिबानने गाड्यांना शहरातील ग्रीन झोनचा रस्ता दाखवला. जिथे हिंसाचार नव्हता, अशा ठिकाणाहून विमानतळापर्यंत आणण्यात आलं. “जेव्हा आम्ही दूतावासातून दुसऱ्या समूहाला बाहेर काढत होतो. तेव्हा रस्त्यात काही तालिबान्यांनी आम्हाला सुरक्षा दिली आणि आम्हाला बाहेर निघण्यास मदत केली”, असं ग्रुपमध्ये शामिल असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. दुसरीकडे भारतीय वायुसेनेचं सी १७ विमान विमानतळावर वाट बघत होतं. या विमानातून भारतीय मायदेशी परतले.

“अफगाणिस्तानला गिळण्याची पाकिस्तानची क्षमता नाही”; अमरुल्लाह सालेह यांचे तालिबानलाही आव्हान

तालिबान्यांनी रविवारी देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडून पळून जाण्यासाठी धडपड करत आहेत. रविवारी विमानतळाबाहेर तर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. इतकंच नाही तर काही नागरिक अमेरिकन लष्कराच्या विमानाला लटकले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर खाली पडून या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान काबूल विमानतळावर आतापर्यंत १२ नागरिक ठार झाले आहेत. नाटो आणि तालिबानच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रॉयटर्नसे यासंदर्भात वृत्त दिलं आहे.