तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारी मध्यरात्री कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले असतानाच मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी पुन्हा या विमानतळाला लक्ष्य केले. विमानतळ सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण छावणीवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, मात्र पाकिस्तानी सैन्यदल आणि निमलष्करी दलांनी या हल्ल्यास प्रत्युत्तर दिल्याने हे दहशतवादी पळून गेले.
या दुसऱ्या हल्ल्याची जबाबदारी ‘तेहरिक ए तालिबान’ या संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेचा दहशतवादी ओमर खोरसानी याने ट्विटरवर तसा संदेश दिला. विमानतळाजवळच बिताई आबाद नावाची ही प्रशिक्षण छावणी होती. दोन अतिरेक्यांनी या ठिकाणी असलेल्या छावणी क्रमांक दोनवर हल्ला केला. मात्र अतिरेकी सुरक्षा कडे तोडू शकले नाहीत आणि गर्दीच्या निवासी भागाचा फायदा घेऊन त्यांनी पोबारा केला.
‘‘या घटनेत वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला. पाच अतिरेकी छावणीत घुसल्याचा व त्यांच्याशी सुरक्षा दलांनी झटापट केल्याचे वृत्त निराधार व चुकीचे आहे,’’ असे या प्रशिक्षण छावणीचे प्रवक्ते कर्नल ताहीर अली यांनी सांगितले. प्रत्यक्षात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी ‘डी’ प्रवेशद्वारातून प्रवेश केला आणि छावणीच्या प्रवेशद्वारासमोर तैनात असलेल्या दोन जवानांवर गोळीबार केला, पण सैन्यदलांनी लगेच प्रतिकार केल्याने ते शेजारच्या पेहलवान गोथ या भागात पळून गेले, अशी माहिती ताहीर यांनी दिली. आता परिस्थिती नियंत्रणात असून निमलष्करी रेंजर्स व पोलिसांनी या दोन अतिरेक्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली आहे.
हवाई हल्ल्यात १५ अतिरेकी ठार
कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यदलाने दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. देशाच्या वायव्येकडील दुर्गम भागात पाकिस्तानी हवाई दलाने विमानांच्या साहाय्याने बॉम्बहल्ला केला. त्यात १५ दहशतवादी ठार झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा