तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानच्या १७ सैनिकांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  स्थानिक सुरक्षा रक्षकांवर अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. बादखशान येथे तालिबान्यांनी या १७ सैनिकांना ओलीस ठेवले होते आणि त्यांचे मृतदेह स्थानिकांना ताजिकिस्तान, चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर मिळाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तथापि, काही तालिबान्यांच्या सुटकेच्या मोबदल्यात सात सैनिकांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक दलाने तालिबान्यांचा प्रश्न हाती घेतल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.
वारडूज जिल्ह्य़ात मंगळवारी रात्री स्थानिक नागरिकांना अफगाणिस्तानच्या १७ सैनिकांचे गोळ्यांनी चाळणी करण्यात आलेले मृतदेह सापडले. आदिवासी पट्टय़ातील काही ज्येष्ठ नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर काही सैनिकांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर हे हत्याकांड घडविण्यात आले, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.
तालिबान्यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली असली तरी चकमकींमध्ये हे सैनिक मारले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. ताब्यात घेण्यात आल्यानंतर सैनिकांना ठार करण्यात आलेले नाही, असेही तालिबान्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडून शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला असून दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

Story img Loader