तालिबानी दहशतवाद्यांनी रस्त्याच्या कडेला घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात एक प्रवासी वाहन सापडून सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका घटनेत दहशतवाद्यांनी चार अफगाणी सैनिकांची गळे कापून हत्या केल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
हेरातच्या पश्चिम प्रांतातील शिंदांद येथे जाणाऱ्या प्रवाशांचे वाहन दहशतवाद्यांनी रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट घडवून उडवून दिले. या स्फोटात मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाल्याची माहिती अंतर्गत कामकाज मंत्रालयाने दिली. या हल्ल्यामागे तालिबान्यांचा हात असल्याचा आरोप मंत्रालयाने केला आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रवक्ते मोईद्दीन नूरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानचे शत्रू असणाऱ्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केल्याचे नूरी यांनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. सोमवारीदेखील अशाच स्फोटात सात जणांचा बळी गेला होता.
दरम्यान, ज्वाझान भागात चार अफगाण सैनिकांचे मृतदेह आढळून आले. या सैनिकांचे गळे कापण्यात आले होते. सुट्टीनिमित्त घरी जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. ख्वाजा डोकोह जिल्ह्य़ाचे प्रमुख अधिकारी सायरा शेकिब यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
अफगाण सैन्य आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या फौजांवर हल्ले करण्यासाठी तालिबानी तसेच इतर दहशतवादी संघटना रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट घडवणे या मुख्य अस्त्राचा वापर करतात.
दरम्यान, अफगाण सैनिक आणि मित्र राष्ट्रांच्या पथकाने १० प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत मंगळवारपासून ३८ दहशतवादी मारले गेल्याची माहिती अंतर्गत कामकाज मंत्रालयाने दिली.

Story img Loader