पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस स्थानकावर ताबा मिळवला असून अनेकांना ओलीस ठेवलं आहे. खैबर पैख्तुनवा प्रांतात ही घटना घडली असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकिस्तानमधील पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या दहशतवाद्यांनी अशांत प्रांतातील बन्नू कॅन्टोन्मेंटमध्ये घुसखोरी करत कैदेत असलेल्या वॉण्टेड दहशतवाद्यांची सुटका केली.
यानंतर दहशतवाद्यांनी तेथील परिसराचा ताबा घेतला. तसंच दहशतवादविरोधी विभागाच्या सुरक्षा जवानांना ताब्यात घेतलं. “दहशतवाद्यांनी बाहेरुन हल्ला केला की अटकेनंतर चौकशी सुरु असताना आतील कर्मचाऱ्यांकडून शस्त्रं हिरावून घेतली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही,” अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाकिस्तान लष्कराला तात्काळ पाठवण्यात आलं असून, परिसराला घेराव घालण्यात आला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे.
तालिबानी दहशतवाद्यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, आपल्याकडे नऊ अधिकारी ओलीस असून हवाई मार्गाने अफगाणिस्तानला जाण्याची व्यवस्था करा अशी मागणी केली आहे.