अफगाणिस्तानमध्ये सरकारी लष्करी दल आणि बंडखोर तालिबानमध्ये संघर्ष सुरुच आहे. असं असतानाच शुक्रवारी तालिबानने अफगाणिस्तानमध्ये मुसंडी मारुन दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली. तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून काही दिवसांमध्ये तालिबान राजधानीचं शहर काबूलही ताब्यात घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कंदाहारवर तालिबानने ताबा मिळवल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. मागील काही दिवसांपासून तालिबानने अनेक मोठी शहरं ताब्यात घेतल्याने आता काबूलसंदर्भात चिंता व्यक्त केली जातेय. आतापर्यंत हेरात या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि कंदाहार या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १८ प्रांतांच्या राजधान्या बंडखोरांच्या ताब्यात गेल्या आहेत. आता अफगाणिस्तानच्या दोन -तृतीयांश भागावर त्यांचे नियंत्रण आहे. तालिबान्यांनी राजधानी काबूललाही वेढा दिला असून तेथे धुमश्चक्री सुरू आहे.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : भारताला मित्र मानता की शत्रू?; तालिबानने स्पष्ट केली भूमिका

काबूलला जोडणार मार्ग बंद

हेरात या ऐतिहासिक शहरात ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांपूर्वीची एक मशीद तालिबानने ताब्यात घेतली आहे. तसेच तेथील सरकारी इमारतींवरही कब्जा केला आहे. शुक्रवारी सरकारी इमारतींमध्ये गोळीबारांचे आवाज येत होते. तालिबानचे वर्चस्व असलेला शहराचा इतर भाग मात्र शांत होता. गझनी शहरही तालिबानने घेतले आहे. परिणामी, राजधानी काबूलला जोडणारे काही महामार्ग बंद झाले आहेत.  अमेरिकी सैन्यमाघारीचा शेवटचा टप्पा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी तालिबान्यांनी दक्षिण अफगाणिस्तानच्या जवळजवळ सर्व भागावर ताबा मिळवला आहे. त्यात हेल्मंड या शहरासह चार प्रांतांच्या राजधान्यांचा समावेश आहे. याच हेल्मंड प्रांतात अमेरिका, ब्रिटन, नाटो यांच्या फौजा आणि तालिबान्यांमध्ये गेल्या २० वर्षांत अनेक रक्तरंजित लढाया झाल्या होत्या. त्यांत शेकडो परदेशी सैनिक मारले गेले होते.

नक्की वाचा >> …म्हणून दानिश सिद्दीकीची हत्या झाली; तालिबानने दिलं स्पष्टीकरण

या प्रांतांवर अफगाणिस्तानची सत्ता

मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १८ प्रांतांच्या राजधान्या बंडखोरांच्या ताब्यात असल्याने अफगाणिस्तानच्या ६५ टक्के भूभागावर आता तालिबानचा ताबा आहे. कोणते प्रांत कधी तालिबानच्या ताब्यात गेले पाहुयात
झारनी – ६ ऑगस्ट
शेबीरगान – ७ ऑगस्ट
सार-ए-पॉल – ८ ऑगस्ट
कुदूझ – ८ ऑगस्ट
ताक्वान – ८ ऑगस्ट
आयबक – ९ ऑगस्ट
फराह – १० ऑगस्ट
पॉल-ए-खुमारी – १० ऑगस्ट
फरिझाबाद – ११ ऑगस्ट
गाझनी – १२ ऑगस्ट
हेरात – १२ ऑगस्ट
कंदाहार – १२ ऑगस्ट
लष्कर गाह – १३ ऑगस्ट
क्वाला ए नाव – १३ ऑगस्ट
फिरुज कोह – १३ ऑगस्ट
पॉल-ए-अलम – १३ ऑगस्ट
तेराकोट – १३ ऑगस्ट
कालत – १३ ऑगस्ट

राष्ट्राध्यक्ष संवाद साधणार

अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी हे लवकरच देशाला संबोधित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राजधानी काबूलपासून तालिबानी बंडखोर ५० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असल्याने राष्ट्राध्यक्ष लवकरच देशातील नागरिकांना संबोधित करुन संदेश देतील असं म्हटलं जात आहे. अफगाणिस्तानचे पहिला उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. आम्ही तालिबानला रोखण्यासाठी वाटेल ते करु असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंदाहारही गेलं

कंदाहार हा देशातील दुसरा मोठा प्रांत आणि त्याची त्याच नावाची राजधानीही तालिबान्यांनी ताब्यात घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंदाहार प्रांत गुरुवारी रात्री तालिबानच्या ताब्यात गेला. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी विमानाने पळ काढला.

हेल्मंडही गमावलं

हेल्मंड प्रांताच्या मंडळाचे प्रमुख अताउल्ला अफगाण यांनी सांगितले की, लष्कर गह हे राजधानीचे ठिकाणही तालिबानच्या ताब्यात गेले असून सरकारी इमारतींवर तालिबानचा पांढरा ध्वज फडकला आहे. मात्र लष्कर गह येथील तीन लष्करी तळ अजून सरकारी दलांच्या नियंत्रणात आहेत.

झाबुलमध्येही तालिबान

झाबुल प्रांताचे प्रमुख अता जन हकाबयान यांनी सांगितले की, स्थानिक राजधानी कलाट तालिबानच्या हाती पडली आहे. जवळच्या लष्करी छावणीतील अधिकाऱ्यांनी तेथून माघार घेतली. अफगाणिस्तानच्या उरूझगान प्रांताच्या दोन लोकप्रतिनिधींनी सांगितले की, तिरीन कोट ही स्थानिक राजधानीही तालिबानने जिंकली आहे. बिस्मिल्ला जॅन महंमद आणि कुद्रतुल्ला रहिमी यांनी शरणागतीची कबुली शुक्रवारी दिली आहे. तेथील गव्हर्नरांनी विमानात बसून पळ काढला आहे. कंदाहार व हेरात ही दोन ठिकाणे तालिबानच्या ताब्यात जाणे घातक ठरले आहे.

तालिबानचे वाढते वर्चस्व…

अमेरिकी सैन्याने २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात प्रवेश करून तालिबान सरकारला हुसकावून लावले होते. आता काबूलही धोक्यात आले असून इतरत्र सुरू असलेल्या धुमश्चाक्रीने तालिबानचे वर्चस्व वाढतच चालले आहे. अमेरिकेने काबूलमधील त्यांचा दूतावास रिकामा करण्यासाठी तीन हजार सैनिक पाठवले होते. पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले की, एक लष्करी व दोन सागरी दलांच्या तुकड्या दोन दिवसांत काबूलच्या विमानतळावर पाठवून दूतावासातील अमेरिकी लोकांची सुटका करण्याचे ठरवले आहे. ब्रिटनने ६०० सैनिक ब्रिटिश नागरिकांना परत आणण्यासाठी पाठवले आहेत.

…तर अफगाणिस्तान पुन्हा बंडखोरांकडे

राजधानी काबूलला आता लगेच धोका नसला तरी बंडखोरांची घोडदौड अशीच सुरू राहिली तर येत्या ३० दिवसांत हे शहर त्यांच्या ताब्यात जाऊ शकते. त्याचबरोबर तालिबानी बंडखोर काही महिन्यांतच पुन्हा अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, असा इशारा अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विभागाने दिला आहे.

Story img Loader