तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबान प्रवक्ता सुहैल शाहिन याने काश्मीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे तालिबानचं वक्तव्य भारतासाठी चिंता वाढवणारं आहे. “आमच्याकडे काश्मीरमधील मुस्लिमांचा आवाज उचलण्याचा अधिकार आहे.”, असं वक्तव्य प्रवक्ता सुहैल शाहिन याने मुलाखती दरम्यान केलं.
“कोणत्याही देशासोबत सशस्त्र लढा देण्याचा आमचा हेतू नाही. मुस्लिम असल्याने भारताच्या काश्मीर किंवा इतर कोणत्याही देशातील मुस्लिमांच्या बाजूने आवाज उचलण्याचा अधिकार आहे. आम्ही आवाज उठवू आणि सांगू मुसलमान तुमचे लोक आहेत. देशाचे नागरिक आहेत. कायद्यानुसार समान आहेत.”, असं प्रवक्ता सुहैल शाहिन यांनं बीबीसीशी बोलताना सांगितलं.
यापूर्वी तालिबाननं काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असून हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. भारत आणि पाकिस्ताननं आपल्या अंतर्गत लढाईसाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं तालिबानी नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझई यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. तसेच तालिबानला शेजारील राष्ट्रांशी चांगले संबंध हवे असल्याचं देखील सांगितलं होतं. तालिबानचे भारतासोबत संबंध कसे असतील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तालिबानचे नेते स्टेनिकझई यांनी माध्यमांमध्ये अनेकदा काही गोष्टी चुकीच्या येत असतात, असं सांगितलं होतं.
अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना मोठा धक्का
दुसरीकडे इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्याने तालिबान पाकिस्तानसोबत असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. “तालिबान येऊन काश्मीर जिंकून पाकिस्तानला देतील”, असं वादग्रस्त विधान नीलम इरशाद शेख यांनी पाकिस्तानातील बोल टीव्हीच्या चर्चेदरम्यान केलं होतं. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे तालिबानशी चांगले संबंध असल्याचं बोललं जात आहे.