पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ डिसेंबरला (नाताळ) नियोजित असलेल्या अफगाणिस्तान दौऱ्यावेळी जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य दुतावासावर दहशतवादी हल्ला करण्याचा संभाव्य कट अफगाणिस्तानच्या गुप्तहेर संघटनांनी उघडकीस आणला आहे.
अफगाणिस्तानच्या नव्या संसदेची इमारत भारताच्या सहकार्याने बांधण्यात आली आहे. काबूलमधील या नव्या इमारतीचे मोदींच्या हस्ते २५ डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. मोदींचा हा कार्यक्रम सुरू असताना पाकिस्तानच्या सीमेजवळील अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे असलेल्या भारतीय वाणिज्य दुतावासावर हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना होती, असे नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटी या अफगाणी गुप्तहेर संस्थेने केलेल्या तपासात निष्यन्न झाले.
अफगाणी गुप्तहेर संस्थेने कारी नसीर नावाच्या या कटाच्या सूत्रधाराची ओळख पटवली आहे. तो अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील कपिसा प्रांतातील तगब येथील धर्मशास्त्राचा विद्यार्थी आहे. त्याने दिलेल्या जबानीनुसार त्याला पाकिस्तानमधील दहशतवादी शिबिरात प्रशिक्षण मिळाले असून पेशावर येथील तालिबानच्या तलावरून हल्ल्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्याच्याकडे जलालाबादच्या दुतावासाची टेहळळी करण्यासाठी सूक्ष्म कॅमेरा, तसेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमने सुसज्ज घडय़ाळ सापडले आहे. या आठवडय़ात अफगाण सुरक्षा दलांनी अटा-उर-रहमान उर्फ हंझल्ला आणि अब्दुल्ला उर्फ कारी इस्माईल या इस्लामिक स्ेटट (आयसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे ३० किलो स्फोटके सापडली होती. हा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्सच्या संपर्कात असलेल्या अक्तार मोहम्मद मन्सूर या तालिबानी म्होरक्याच्या संगनमताने रचला होता अशी माहितीही उघड झाली आहे.

Story img Loader