निर्मला सीतारमन यांनी बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांना कडाडून टीका केली आहे. असं असलं तरी देशाबाहेर भारतीय अर्थसंकल्पाचं कौतुक होत आहे. तालिबानने गुरुवारी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. भारताच्या आर्थिक मदतीच्या घोषणेमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल, असं तालिबानकडून सांगण्यात आलं. खामा प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात अफगाणिस्तानसाठी २५ दशलक्ष डॉलरच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव मांडला आहे. यावर तालिबानने प्रतिक्रिया दिली आहे. भारताने अफगाणिस्तानला २०० कोटी रुपयांच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबीज केल्यानंतर भारताकडून सलग दुसऱ्यावर्षी अफगाणिस्तानसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही भारताने अफगाणिस्तानला आर्थिक मदत करण्याबाबत घोषणा केली होती, असंही खामा प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचा- “नमाज पठण करा अन् हिंदू मुलींना…”, बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान
भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करताना तालिबान संघटनेच्या वाटाघाटी गटाचे माजी सदस्य सुहेल शाहीन म्हणाले, “अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारतानं केलेल्या आर्थिक मदतीच्या घोषणेची आम्ही प्रशंसा करतो. अफगाणिस्तानमधील अशा अनेक प्रकल्पांना भारताकडून निधी देण्यात आला आहे. भारताने या प्रकल्पांवर पुन्हा काम सुरू केल्यास दोन्ही देशांमधील संबंध वाढतील आणि अविश्वासाचे वातावरण संपेल.”