तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून महिलांवरील निर्बंधाबाबत दररोज नव-नवीन आदेश जारी केले जात आहेत. कधी त्यांना खेळण्यापासून रोखलं जातं, तर कधी काम करणाऱ्या महिलांना घरीच राहण्याचे आदेश दिले जातात. त्यातच आता तालिबान मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत देखील कडक कायदे करणार आहे. तालिबानच्या या राजवटीत आता अफगाण विद्यापीठांमध्ये मुलं आणि मुली एकमेकांना भेटू नयेत, त्यांनी एकमेकांकडे पाहू देखील नये यासाठी वर्गात चक्क पडदे लावले जातील, असं वृत्त आहे. नवीन प्रस्तावानुसार, पडदे लावण्याबरोबरच मुलं आणि मुलींसाठी वर्ग देखील वेगवेगळ्या वेळांमध्ये भरवले जातील.
तालिबानच्या कब्जानंतर अफगाणिस्तानमधील हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. तालिबान प्रशासनाने अद्याप शिक्षणासाठी स्पष्ट असा कोणताही रोडमॅप सादर केला नाही. या निश्चिततेमुळे काबुल विद्यापीठातील तब्बल २६ हजार विद्यार्थी आणि कंदाहार विद्यापीठातील १० हजार विद्यार्थी आपल्या भविष्याच्या चिंतेत आहेत. विशेषतः महिलांच्या शिक्षणाबाबत असलेली तालिबानची भूमिका अधिकच मोठा चिंतेचा विषय आहे. काबुल विद्यापीठात सुमारे १२ हजार मुली शिक्षण घेत आहेत आणि तर कंदाहार विद्यापीठात १ हजार मुली शिकत आहेत.
हे सोपं नाही..
अनेक खाजगी विद्यापीठांनी मर्यादित विद्यार्थ्यांच्या संख्येत पुन्हा वर्ग सुरू केले आहेत. कंदाहार विद्यापीठाचे कुलगुरू अब्दुल वहीद वासिक यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, “सरकारी विद्यापीठं ही पैसे आल्यानंतरच पुन्हा सुरू होऊ शकतात. त्याचसोबत, सरकारी विद्यापीठांमध्ये खासगी विद्यापीठांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. खाजगी विद्यापीठांमध्ये प्रत्येक वर्गात फक्त १० ते २० विद्यार्थी असतात आणि म्हणून अशा वर्गांमध्ये स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळं करणं खूप सोपं आहे. परंतु, आमच्याकडे प्रत्येक वर्गात सुमारे १०० ते १५० विद्यार्थी आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ते तितकं सोपं नाही.”
वर्गांमध्ये लागतील पडदे
अफगाणिस्तानमध्ये सुमारे ४० सार्वजनिक विद्यापीठं आहेत. तालिबानने महिला-पुरुष सहशिक्षणावर बंदी घालण्याचं आदेश दिल्यानंतर आता उच्च शिक्षण मंत्रालयाला राज्य विद्यापीठं पुन्हा सुरू करण्याची योजना सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. सद्यस्थितीत बहुतेक विद्यापीठांनी मुलींना पडदे असलेल्या वर्गात किंवा क्यूबिकल्समध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
रुग्णालयांप्रमाणे वर्गात डिव्हायडर लावू!
तखार विद्यापीठाचे कुलगुरू खैरुद्दीन खैरखा म्हणाले की, “मुला -मुलींसाठी स्वतंत्र वर्ग आयोजित करण्याची आमची योजना आहे. जेथे एका वर्गात १५ पेक्षा जास्त मुली असतील तेथे हे लागू होईल. हे करण्यासाठी आम्ही शिफ्टमध्ये वर्ग सुरू करण्याचा विचार करत आहोत. जर १५ पेक्षा कमी मुली असतील तर आम्ही रुग्णालयांप्रमाणे वर्गात डिव्हायडर लावू.”
महिला विद्यार्थ्यांसाठी शिक्षकही महिलाच
काबूल विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितलं की, तालिबान्यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद देताना लिंगभेदाची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, विद्यापीठाला महिला विद्यार्थ्यांचं त्यांच्या स्थानिक प्रांतांमध्ये स्थलांतर करण्याबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. पण काबूल विद्यापीठाचा स्वतःचा वेगळा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये घेऊन जाणं शक्य नाही. तालिबानचं असंही म्हणणं आहे कि महिला विद्यार्थ्यांसाठी फक्त महिला शिक्षिकाच असाव्यात. मात्र, हे देखील शक्य नाही कारण महिला शिक्षकांची संख्या खूप कमी आहे.