तालिबान्यांनी १५ ऑगस्टला अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यापासून जागतिक स्तरावर या घडामोडीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमधल्या मानवाधिकारांपासून ते दहशतवादी कारवायांच्या बळ मिळण्याच्या भितीपर्यंत अनेक बाबींवर चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे तालिबानकडून नव्या सरकारला जागतिक स्तरावर स्वीकृती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करणाऱ्या नाटो अर्थात नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनला तालिबाननं हल्ल्यांचा काळ संपल्याचा इशारा दिला आहे. तसेच, नाटोनं या गोष्टी लक्षात घेऊन चर्चेवर भर द्यायला हवा, असं देखील तालिबानकडून सांगण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदनं अरियाना न्यूजला दिलेल्या मुलाखतीच्या हवाल्याने एएनआयनं हे वृत्त दिलं आहे. यामध्ये, झबिउल्लाहनं थेट नाटोवर निशाणा साधला आहे. “कदातिच नाटोच्या प्रमुखांना (जेन्स स्टोलटेनबर्ग) काही काळासाठी या गोष्टीमुळे वाईट वाटेल, ते त्यांच्या अपयशाबद्दल देखील बोलतील. पण आता त्यांनी हे ध्यानात घ्यायला हवं की हल्ले करण्याचा काळ आता संपला आहे. अशा प्रकारच्या कारवाया यशस्वी ठरत नाहीत, हे २० वर्षांपूर्वीच सिद्ध झालं होतं. अशा समस्यांवर धोरणात्मक चर्चांमधूनच मार्ग निघू शकतो”, असं झबिउल्लाह म्हणाला आहे.

गेल्याच आठवड्यात नाटोचे प्रमुख जेन स्टोलटेनबर्ग यांनी अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचं जाहीर केलं होतं. “अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या गोष्टींबाबत आपण सावध असायला हवं. शिवाय, अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना पुन्हा एकत्र तर येत नाहीत ना, यावर देखील लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तसेच, दहशतवादाविषयी तालिबान्यांनी दिलेल्या आश्वासनांसाठी त्यांनाच जबाबदार धरायला हवं”, असं ते म्हणाले होते.

‘सबका साथ’साठी तालिबान तयार, पण…” तालिबानी नेत्यानं स्पष्ट केली भूमिका!

दरम्यान, झबिउल्लाहनं हा दावा फेटाळून लावला आहे. “तालिबान कधीही अफगाणिस्तानला जागतिक महासत्तांमधल्या संघर्षासाठीचं केंद्र होऊ देणार नाही”, असं झबिउल्लाहनं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानच्या हस्तक्षेपाविषयी झबिउल्लाह म्हणतो…

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप होत असल्याचं बोललं जात आहे. तालिबान्यांना पाकिस्तानचीच फूस असल्याचा देखील दावा केला जात आहे. झबिउल्लाहने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. “मी १०० टक्के दाव्याने सांगू शकतो की आम्हाला कुणाचाही हस्तक्षेप नको आहे. पाकिस्तानचा देखील नाही. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. आम्ही हे असे हस्तक्षेप सहन करत नाही. पाकिस्तान हा एक वेगळा देश आहे. आम्हाला त्यांच्या देशात हस्तक्षेप करायचा नाही आणि ते देखील आमच्या देशात हस्तक्षेप करू शकत नाहीत”, असं झबिउल्लाहनं स्पष्ट केलं आहे.