एपी, इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान त्यांचा चेहरा झाकणे अनिवार्य करणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास देशातील तालिबान सत्ताधाऱ्यांनी रविवारी सुरुवात केली. तालिबानच्या कट्टरवादी भूमिकेचा हा भाग असून, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे.

गुरुवारी हा आदेश जाहीर करण्यात आल्यानंतर काही मोजक्या वृत्तवाहिन्यांनी तो अमलात आणला. मात्र रविवारी तालिबानच्या संबंधित मंत्रालयाने आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यानंतर बहुतांश महिला निवेदिकांनी त्यांचे चेहरे झाकलेले दिसत होते.

हे धोरण ‘अंतिम व तडजोड न होण्याजोगे’ असल्याचे माहिती व संस्कृती मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केले. ‘ही बाहेरची संस्कृती असून, आम्हाला जबरीने चेहरा झाकण्यास सांगून आमच्यावर ती लादण्यात आली आहे आणि त्यामुळे कार्यक्रम सादर करताना आमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात,’ असे टोलो न्यूजच्या निवेदिका सोनिया नियाझी म्हणाल्या.

तालिबानकडून जबरदस्ती

आपल्या केंद्राला गेल्या आठवडय़ात हा आदेश मिळाला होता, मात्र रविवारी त्याची अंमलबजावणी करण्याची जबरदस्ती करण्यात आली, याला एका स्थानिक माध्यमाच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला, तसेच याबाबत कुठलीही चर्चा होणार नसल्याचेही सांगण्यात आल्याचे तो म्हणाला. तालिबानी अधिकारी बदला घेतील या भीतीने त्याने स्वत:ची ओळख उघड केली नाही.

Story img Loader