जगभरात सध्या चर्चा आहे ती तालिबान आणि अफगाणिस्तानची. अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल २० वर्षांच्या मुक्कामानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्या. यावेळी देखील अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी अवघ्या काही महिन्यांतच तालिबान अफगाणिस्तानवर पुन्हा अंमल प्रस्थापित करेल, असा अंदाज वर्तवला होता. पण हे सगळे अंदाज खोटे ठरवत तालिबाननं अवघ्या काही आठवड्यातच आख्खा अफगाणिस्तावन आपल्या बंदुकीच्या दहशतीखाली आणला आहे. जागतिक पटलावर या घटनेचे किती आणि कसे दूरगामी परिणाम होतील, याची चर्चा राजकीय विश्लेषक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक करत आहेतच. पण आजघडीला दोन महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत.

नागरिकांना सुरक्षित बाहेर कसं काढणार?

त्यातला पहिला मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानमध्ये अडकलेले इतर देशांचे नागरिक आणि ज्यांना अफगाणिस्तान सोडायचंय असे अफगाणिस्तानचेच नागरिक यांना देशाबाहेर कसं आणायचं? कारण काबुल पादाक्रांत करणाऱ्या तालिबान्यांनी सर्वात आधी तिथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या नियंत्रणात घेतलं. त्यामुळे सर्वच देशांना आणि त्यांच्या अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांना धडकी भरली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या दूतावास अधिकाऱ्यांनी किंवा परराष्ट्र मंत्रालयांनी तालिबान्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेची तयारी सुरू केली आहे. भारतीयांसाठी देखील ही बाब चिंतेची ठरली असून एअर इंडियाला बराच काळ काबुलवर हवेतच घिरट्या घालाव्या लागण्याची वेळ ओढवली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं तालिबानला समर्थन: म्हणाले, “गुलामीच्या जोखडातून…!”

सत्तांतराचं काय?

यातला दुसरा मुद्दा म्हणजे तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर आता नेमकं सत्तांतर कसं होणार आहे? एखाद्या देशात लष्कर किंवा बंडखोर सत्ता हस्तगत करतात, तेव्हा तिथे काय घडतं किंवा अफगाणिस्तानमध्ये आता काय घडणार आहे याची चर्चा सुरू आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या पदच्युत झालेल्या सरकारमधील गृहमंत्र्यांनी हिंसाचार न होता सत्तांतर होईल, असं स्पष्ट केल्यामुळे तर ही चर्चा अधिकच वाढली आहे.

अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी देश सोडला!

दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अशरफ घनी यांनी याआधीच देशातून पळ काढला आहे. देशवासीयांना त्रास होऊ नये, म्हणून आपण देश सोडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तांतराची प्रक्रिया अधिकच क्लिष्ट आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी अधिक काळ दहशतीच्या छायेखाली ठेवणारी झाली आहे.

अफगाणिस्तान : पैशाने भरलेल्या ४ गाड्या आणि हेलिकॉप्टर घेऊन पळून गेले अशरफ घनी!

अध्यक्षांनी देश सोडला, देशात काय घडतंय?

राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर आता अफगाणिस्तानमधील पदच्युत सरकारमधील काही नेत्यांनी एक कौन्सिल स्थापन केली आहे. तालिबानी आणि अफगाणिस्तान यांच्यात समन्वय करून ही कौन्सिल सत्तांतराची कार्यवाही करेल. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. यानुसार, हाय कौन्सिल फॉर नॅशनल रिकौन्सिलिएशनचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला, हिज्ब ए इस्लामीचे नेते गुलबुदीन हेकमाटयार आणि हमीद करझई स्वत: या कौन्सिलचे सभासद असतील. अफगाण नागरिकांचा मनस्ताप कमी करून शांततापूर्ण वातावरणात सत्तांतर व्हावं यासाठी ही व्यवस्था केल्याचं हमीद करझई यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानकडून ही योजना केलेली असताना तालिबानने त्याला अद्याप मंजूरी दिली नसून नेमकी तालिबानची यासंदर्भात काय भूमिका असेल, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader