अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ टाकल्यानंतर आयसिसचे अनेक दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सक्रिय असलेले दहशतवादी आणि अफगाणिस्तानचे सैनिक यांच्यामधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. लष्करी तळावर तालिबानने केलेल्या हल्ल्यात १०० हून अधिक सैनिक ठार झाले असल्याचे अफगाणच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये असलेल्या लष्करी तळावर तालिबानच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर दहशतवादी आणि सैनिकांमध्ये चकमक झाली.
मझर-इ-शरिफ या शहरा जवळ हे लष्करी तळ होते. या हल्ल्यामध्ये १०० हून अधिक सैनिक ठार झाले असून अनेक सैनिक जखमी झाले आहेत. लष्कराच्या गणवेशात येऊन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दोन हल्लेखोरांनी सर्वात आधी स्वतःला उडवून दिले. त्यानंतर इतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. या हल्ल्यात नागरिक ठार झाले नसल्याची माहिती अफगाणच्या मंत्रालयाने दिली आहे. एकूण १० दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. काही दिवसांपूर्वी काबूल येथे झालेल्या हल्ल्यात १०० हून अधिक कर्मचारी आणि सैनिक ठार झाले होते.
यावेळी हल्ला करताना दहशतवादी डॉक्टरांसारखा पेहराव करुन आले होते. सैनिक आणि पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या हल्लांमध्ये २०१५ या वर्षाच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये ६,८०० सैनिक आणि पोलीस ठार झाले होते. अफगाणिस्तानमध्ये आयसिसने तळ ठोकल्याचे पाहून अमेरिकेने त्यांच्यावर कारवाई केली. नुकताच त्यांच्या एका तळावर हल्ला करुन अनेक दहशतवादी त्यांनी ठार केले.
त्यानंतर सर्वच गटांचे दहशतवादी सक्रिय झाल्याचे चित्र अफगाणिस्तानमध्ये निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानच्या एक तृतिआंश पेक्षा अधिक मोठ्या भूभागावर सरकारचे नियंत्रण नाही. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दहशतवादी गटाचे वर्चस्व आहे. तालिबानसोबत शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याबाबतही विचार करण्यात आला. परंतु, काबूलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर ती बोलणी थांबली होती.