तालिबानने पंजशीरचा प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर ताबा मिळवला आहे. पंजशीरमध्ये सोमवारपासून तालिबान आणि नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये युद्ध सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तालिबानच्या शेकडो सैनिकांनी मंगळवारी रात्री पंजशीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तालिबानने येथील एक पूल सुद्धा स्फोट करुन उडवला. नॉर्दन अलायन्सकडून लढणाऱ्यांची कोंडी करण्यासाठी तालिबानने हा पूल उडवल्याचं सांगण्यात येतं. मात्र दुसरीकडे नॉर्दन अलायन्सने तालिबानच्या ३५० दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याचा दावा केलाय. तर ४० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचंही ट्विटरवरुन सांगण्यात आलं आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या तालिबान्यांना कुठे ठेवण्यात आलं आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलं नाही. नॉर्दन अलायन्सला या संघर्षादरम्यान शत्रूला ठार करण्याबरोबर शस्त्रांचाही मोठा फायदा झाला असून अमेरिकन बनावटीची अनेक शस्त्र त्यांच्या हाती लागलीय.

नक्की वाचा >> “कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांनी पंजशीरमधील युद्धासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांतामध्ये प्रवेश केला जातो त्या ठिकाणा तालिबान आणि नॉर्दन अलायन्समध्ये संघर्ष झालाय. तालिबानने येथील एक पूल उडवून लावला. हा पूल गुलबहार आणि पंजशीरला जोडणारा महत्वाचा रस्ता होता. तसेच तालिबाननेही नॉर्दन अलायन्सच्या अनेकांना ताब्यात घेतलं आहे.

काबूलपासून १५० किमी दूर उत्तरेकडील प्रांताला पंजशीरचं खोरं असं म्हणतात. हा प्रदेश हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आहे. उत्तरेकडे या प्रांताची सीमा पंजशीर नदीपर्यंत आहे. पंजशीरचा उत्तरेकडी भाग हा पर्वतांनी वेढलेला आहे. तर दक्षिणेकडे कुहेस्तानचे डोंगर आहेत. हा प्रदेश वर्षभऱ बर्फाच्छादित असतो. यावरुन हे खोरं किती दुर्गम आहे याचा अंदाज बांधता येतो. तालिबानला पंजशीरच्या प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी नॉर्दन अलायन्ससोबतच येथील भौगोलिक परिस्थितीचाही समाना करावा लागणार आहे.

नक्की वाचा >> “…तर किमान बॉम्ब तरी टाका”; अफगाणिस्तानसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांची बायडेन प्रशासनाकडे मागणी

अमेरिकेने देश सोडताच सोमवारी तालिबान्यांनी पंजशीरवर हल्ला केला. मात्र मंगळवारी या हल्ल्यात तालिबानला मोठे नुकसान झाले. तालिबानला नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे. या संघर्षामध्ये मंगळवारपर्यंत आठ तालिबानी ठार झाल्याची माहिती समोर आली होती. एकीकडे ही लढाई सुरु असतानाच आता नॉर्दन अलायन्सला जगभरामधून हळूहळू पाठिंबा मिळण्यास सुरुवात होत आहे. याची झलक पॅरिसमध्ये पहायला मिळाली. येथे नॉर्दन अलायन्सला पाठिंबा देण्यासाठी शेकडो लोकं हिरवा, पांढरा आणि काळ्या रंगाचा झेंडा आणि अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज येऊन आले होते. त्यांनी नॉर्दन अलायन्सला पाठिंबा असल्याची घोषणाबाजीही केल्याचं सांगण्यात येतं. हे फोटो आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

या फोटोंमध्ये नॉर्दन असलायन्सचे समर्थक मोठ्याप्रमाणात दिसत आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतरही संघर्ष सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत सालेह यांनी ३१ ऑगस्ट रोजीच दिले आहेत. अमेरिकेने घेतलेली माघार या संदर्भात सालेह यांना प्रश्न विचारण्यात आला असता यांनी, “अफगाणिस्तान ते काही शेवटच्या सैनिकाच्या बॅगमध्ये पॅक करुन घेऊन गेलेले नाहीत. देश इथेच आहे. नद्या अजून वाहतायत, डोंगर अजूनही भक्कपणे उभे आहेत. तालिबानी येथील लोकांना आवडत नाहीत आणि त्यांच्याविरोधात येथे द्वेष आहे. म्हणूनच संपूर्ण देशातील लोकांना सध्या देशाबाहेर पडायचं आहे. सुपर पॉवर म्हणवणाऱ्या अमेरिकने ते मिनी पॉवर असल्याचं दाखवून दिलं, पण हरकत नाही,” अशा शब्दांमध्ये अमेरिकेला टोला लगावला.

नक्की वाचा >> “…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

यापूर्वीच्या मुलाखतीमध्ये सालेह यांना अमेरिका अफगाणिस्तान सोडून जाईल यासंदर्भात विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी, “अमेरिकेने उद्या देश सोडायचं ठरवलं तर आमचा त्या निर्णय़ावर काहीच प्रभाव पडणार नाही. आम्ही फक्त त्यांना आमची कथा सांगू शकतो. त्यांना आपलं संयुक्त ध्येय काय होतं याची आठवण करुन देऊ शकतो. आपला एकच शत्रू कोण आहे हे पुन्हा सांगू शकतो पण त्यांनी जायचं ठरवलं तर तो त्यांचा निर्णय असेल,” असं म्हटलं होतं.

Story img Loader