गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान ताब्यात घेतलेल्या तालिबान्यांचा अफगाणिस्तानमधला राडा आख्खं जग उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. तिथल्या सरकारी इमारती, शासकीय निवासस्थानं आणि सार्वजनिक आयुष्यात देखील तालिबान्यांनी घातलेला धुमाकूळ आणि जनतेमधली दहशत देखील समस्त मानवजातीने पाहिली आहे. या पार्श्वभूमीवर आता अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय होणार? रस्त्यावर दहशत पसरवणारे तालिबानी नेमकं कोणत्या प्रकारचं सरकार अफगाणिस्तानमध्ये स्थापन करणार? याविषयी मोठी चर्चा आणि चिंता जगभरातल्या नेतृत्वांमध्ये पसरली आहे. या पार्श्वभूमीवर तालिबानमधलं सरकार नेमकं कसं असेल आणि देशातली व्यवस्था कशी चालेल, याविषयी तालिबानी कमांडर वहिदुल्लाह हाशिमी याने रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकशाहीचा प्रश्नच नाही!

तालिबानमध्ये राजवटीची कोणती व्यवस्था असेल, याविषयी बोलताना वहिदुल्ला हाशिमीनं लोकशाहीची शक्यताच पूर्णपणे फेटाळून लावली आहे. “अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासन व्यवस्था ही पूर्णपणे शरिया कायद्यानुसार काम करेल. हा देश इस्लामिक पद्धतींनुसार काम करेल. इथे कोणत्याही प्रकारे लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असणार नाही. कारण लोकशाहीला आमच्या देशात काहीही आधार नाही. आमचे अफगाणिस्तानमधले, कतारमधले नेते या व्यवस्थेवर काम करत आहेत”, असं वहिदुल्लाहनं म्हटलं आहे.

अध्यक्ष, कौन्सिल, मंत्रिमंडळ…!

तालिबानच्या राजवटीमध्ये वरीष्ठ स्तरावर नेमकी व्यवस्था कशी असेल, नेतृत्व कोण करेल, याविषयी चर्चा आहे. कारण जागतिक स्तरावर अफगाणिस्तानशी असलेले संबंध नेतृत्वावर अवलंबून असणार आहेत. त्याविषयी विचारणा करताच वहिदुल्लाह म्हणाला, “अजून चर्चा झालेली नाही की नक्की कसं सरकार होईल. कदाचित आम्ही एक कौन्सिल बनवू. कौन्सिलचे प्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष असतील. मंत्रिमंडळही असेल. या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची नियुक्ती ही कौन्सिल आणि कौन्सिलचे प्रमुख करतील”.

Afghanistan Crisis: काबूल विमानतळावर १२ जण ठार; तालिबानने नागरिकांना म्हटलं की…

हैबत्तुल्लाहच सर्वोच्च नेता

दरम्यान, तालिबानमधली व्यवस्था कशीही असली, तरी या व्यवस्थेचा प्रमुख म्हणून तालिबान्यांचा सर्वोच्च नेता हैबतुल्लाह अखुंदझादाच असेल, असं वहिदुल्लाहनं ठामपणे सांगितलं आहे. १९९६ ते २००१ या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये असलेल्या तालिबानी राजवटीप्रमाणेच बऱ्यापैकी यावेळी देखील सरकारची रचना असेल. त्या वेळी सर्वोच्च नेता असलेला मुल्लाह ओमर यानं रोजच्या कारभाराची पूर्ण व्यवस्था कौन्सिलवर सोडून दिली होती. यंदा अखुंदझादा कौन्सिलच्या अध्यक्षाच्याही वर असतील आणि देशाच्या राष्ट्राध्यक्षाशी सल्लामसलत करतील, असं देखील वहिदुल्लाहनं सांगितलं आहे. कदाचित अखुंदझादाचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता देशाचा राष्ट्राध्यक्ष होईल.

लष्कर पूर्णपणे नष्ट झालं आहे..

अफगाणिस्तानचं लष्कर पूर्णपणे नष्ट झालं आहे. पण आता आम्ही पुन्हा त्याची बांधणी करणार असल्याचं वहिदुल्लाह म्हणाला. “आधीचं लष्कर पूर्णपणे कोसळलं आहे किंवा संपलं आहे. आता जर आम्हाला त्यांना परत आणायचं असेल तर आम्हाला माहितीये ते आत्ता कुठे राहात आहेत. आम्हाला जर त्यांना घ्यायचं असेल, तर आम्ही त्यांना कॉल करू. आम्हाला त्यांची गरज आहे. कारण त्यांना उच्च दर्जाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यातल्या बहुतेकांनी तुर्की, जर्मनी, इंग्लंडमध्ये उच्च दर्जाचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामुळे ते आम्हाला हवे आहेत. अर्थात, आम्ही काही बदल करू. आम्ही लष्करामध्ये काही सुधारणा करू”, असं वहिदुल्लाहनं स्पष्ट केलं आहे.

महिलांच्या हक्कांचं संरक्षण केलं जाईल असं म्हणणाऱ्या तालिबान्यांनी केलं असं काही…; फोटो व्हायरल

तालिबानला वैमानिकांची आवश्यकता

तालिबानला सध्या प्राामुख्याने वैमानिकांची गरज आहे. अफगाणिस्तानच्या हवाई दलाची अनेक हेलिकॉप्टर्स आणि विमाने तालिबान्यांनी ताब्यात घेतली आहेत. त्यांना चालवण्यासाठी पायलट्सची आवश्यकता असल्याचंही वहिदुल्ला म्हणाला. “आम्ही अनेक पायलट्सला संपर्क केला आहे. नव्या लष्करामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्यांना विचारणा केली आहे. आम्ही अजूनही अनेकांना बोलावणार आहोत”, असं तो म्हणाला. अफगाणिस्तानची एकूण २२ लष्करी विमानं, २४ हेलिकॉप्टर्स आणि शेकडो अफगाण सैनिक उझबेकिस्तानमध्ये आहेत.

Story img Loader