Taliban rule in Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या उच्च शिक्षणांवर निर्बंध घातल्यानंतर तालिबानने महिलांविरोधात आणखी एक नवा नियम लादला आहे. या नव्या नियमानुसार, हेरात प्रांतातील बाग किंवा हिरव्यागार जागा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये महिलांना जाता येणार नाही. महिलांना आपल्या कुटुंबियांसोबत देखील या ठिकाणी येण्यास बंदी घातली आहे.
असोसिएटेड प्रेसने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, अशा ठिकाणांवर दोन भिन्न लिंगांची सरमिसळ होते. त्यामुळे अफगाणिस्तानमधील धार्मिक विद्वान आणि लोकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात सोमवारपासून (११ एप्रिल) तालिबान सरकारने कुटुंबांसह महिलांना बाग किंवा रेस्टॉरंटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.
बंदी घालण्याचे कारण काय?
तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, मौलवींनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, अशा ठिकाणी पुरुष आणि महिलांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे महिलांना अशा ठिकाणी जाण्याची परवानगी देऊ नये. यावर अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, याठिकाणी पुरुष आणि स्त्री एकत्र येतात. यावेळी महिला कथितपणे महिला हिजाब घालत नाहीत,त्यामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत.
सध्या ही बंदी फक्त हेरात प्रांतातील बाग आणि रेस्टॉरंट्सना लागू करण्यात आली आहे. पण पुरुषांसाठी ही सुविधा सुरु असेल. पण हेरात प्रांतामधील वर्च्यु अफेयर्स संचालनालयाचे उप अधिकारी बाज मोहम्मद नझीर यांनी सर्व रेस्टॉरंटमध्ये कुटुंबे आणि महिलांवर निर्बंध लादण्यात आल्याचे मीडिया वृत्त नाकारले आहे.
दरम्यान तालिबानने ऑगस्ट २०२२१ मध्ये अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतली, त्यानंतर महिलांवर अनेक निर्बंध लादले गेले. ज्यामध्ये सहावीनंतर मुलींना शाळेत प्रवेश न देणे, विद्यापीठांमध्ये महिलांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश न देणे याशिवाय युनायटेड नेशन्ससह विविध संस्थांमध्ये महिलांना नोकरी देण्यावर बंदी घालण्यात आली. यानंतर आता महिलांना जिम, पार्क, रेस्टॉरंट सारख्या सार्वजनिक ठिकाणी जाण्यासही बंदी घातली आहे.